ग्रामीण भागातील भारनियमन संत्रा पिकाच्या मुळावर येत असून काही वर्षांपूर्वी लाखो संत्रा झाडे वाळून गेली तशी गत यावर्षीही व्हायला नको, अशी भीती या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
शहरी भागात वातानुकूलित यंत्रणा सुरळीत चालावी म्हणून प्रयत्न केले जातात तर ग्रामीण भागात सोळा तास भारनियमन करून संत्रा पिके उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे. संत्रा हे ‘ज्युसी’ फळ आहे. वैदर्भीय हवामान आणि त्याचा जवळचा संबंध आहे. विदर्भातील तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत जाणार असे भाकित हवामान खात्याने केले आहे. सोळा तास भारनियमन असताना, ४७ अंश सेल्सिअस तापमानात संत्रा आणि त्याची झाडे कशी जगवायची, असा शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे. सात-आठ वर्षांपूर्वी पाणी होते, पण वीज नसल्याने पाण्याचा उपसा करता आला नाही आणि संत्र्याच्या झाडाला पाणी देता आले नाही. त्यावेळी ९० लाख संत्रा झाडे वाळून गेली होती. याहीवर्षी तशी परिस्थिती उद्भवेल काय, अशी भीती वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड, कळमेश्वर, मोहपा, सावनेर पट्टय़ात दिसून येते. चार दिवस वीज सकाळी १० ते ६ जाते आणि तीन दिवस सायंकाळी सहा नंतर जाते. दुपारी वीज असून उपयोग नाही. कारण दुपारीचे उकळते पाणी झाडांसाठी मारक आहे. रोज सोळा तास भारनियमन करण्यात येते तेही अनियमित असते. पहाटेपासून पिकांना पाणी देण्याची योग्य वेळ असते. मात्र, तेही रोजच्या रोज देता येत नाही. अशावेळी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी झाडे तगवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो आहे.
संत्रा उत्पादक अमिताभ पावडे म्हणाले, वीज नाही तर रोज नवीन वीज जोडणी कशी दिली जाते? वातानुकूलित यंत्रणेसाठी वीज आहे, पण शेतकऱ्यांसाठीच ती का नसते? सवंग लोकप्रियतेसाठी नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी वीज स्वस्त केली. वीज स्वस्त करा किंवा सबसिडी द्या, अशी शेतकऱ्यांची मागणी नाही. २४ तास वीज द्या, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. विजेअभावी पाणी ज्याप्रमाणे देता येत नाही, त्याचप्रमाणे विजे अभावी छोटे उद्योगही ग्रामीण भागात लावता येत नाहीत. डाळ मिल्स, मसाले किंवा पिठाच्या गिरण्या, ज्युस फॅक्टरी, पॅकेजिंग युनिटही विजेअभावी शेतकऱ्यांना लावता येत नाही. एकूणच १६ तासांच्या भारनियमनाने संत्रा पीक धोक्यात आले आहे.