कंळबोलीत सध्या विजेचा लंपडाव सुरू असल्याने नागरिक वैतागलेले आहेत. स्टिल मार्केट आणि वसाहत असे मिळून २५ हजार वीज ग्राहकांना महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका बसत आहे. अधिकाऱ्यांकडून देखभालदुरुस्ती कामाच्या नावाखाली दर मंगळवारी शहरात सक्तीचे लोडशेडिंग करण्यात येत आहे.
दिवसातून एकवेळा वीज गायब होत नाही असा दिवस कळंबोलीकरांच्या स्मरणात नाही. रविवारी सकाळ ते सायंकाळ या वेळेत विद्युतपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. नियमित आणि वेळेत वीज बिले भरूनही वीज ग्राहकांना अखंडित विजपुरवठय़ाला रोज सामोरे जावे लागत आहे. आठवडय़ाच्या दर मंगळवारी कामे करण्यासाठी वीजपुरवठा बंद ठेवून नेमकी कोणती कामे महावितरणचे अधिकारी करतात, असा प्रश्न यामुळे नागरिकांपुढे पडला आहे. जुनाट यंत्रणेमुळे कळंबोलीमध्ये विजेचा बोजवारा उडाला असताना नवीन उपकेंद्र उभारण्यासाठीच्या पाठपुराव्यासाठी येथील अधिकाऱ्यांना रस नाही. अधिकाऱ्यांची ही वर्तणूक असल्याने येथील कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या तक्रारींना उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून न्यावी लागत आहे. रात्रीच्या वेळी कळंबोलीची वीज गेल्यास महावितरणच्या उपकेंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो. नवीन जोडण्या देण्यापूर्वी जुन्या वीज ग्राहकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे संयमी वीजग्राहकांचा कडेलोट होईल अशी येथील परिस्थिती बनली आहे.

वीज वाहिनी टाकण्याचे काम २० दिवसांत पूर्ण होणार
तळोजाहून कळंबोलीसाठी वीज वाहिनी टाकण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. येत्या २० दिवसांत हे काम शंभर टक्के पूर्ण होईल. त्यामुळे कळंबोलीकर या अखंडित वीजप्रवाहाच्या संटकातून मुक्त होईल. तसेच नवीन जोडणी व जुनी जोडणी असा दुजाभाव केला जात नसल्याचे महावितरणचे कंळबोली विभागाचे उपकार्यकारी अभियंते राजीव रामटेके यांनी स्पष्ट केले आहे.