महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवडणूक या महिन्यात होणार असून  सभापतींसह नव्या आठ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह वाडा आणि बंगल्यावर फेऱ्या सुरू केल्या आहेत. या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महापालिकेची निवडणूक २०१७ मध्ये होणार आहे. येणारे वर्ष स्थायी समिती सदस्यांसाठी अतिशय महत्त्वाचे राहणार असल्यामुळे प्रत्येकाने समितीवर वर्णी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीवर भाजप्रणीत शहर विकास आघाडीचे ९ सदस्य आहेत.  काँग्रेसचे चार, राष्ट्रवादी काँग्रेस, सेना आणि बसपाचा एक या प्रमाणे सदस्य आहेत. यातील आठ सदस्यांची निवृत्ती येत्या १६ तारखेला होणार आहे. त्यात भाजपचे पाच तर राष्ट्रवादी काँग्रेस, सेना आणि बसपाच्या एका सदस्यांचा समावेश आहे. मात्र सर्वच सदस्यांना आता एक वर्षांचा कार्यकाळ देण्यात येणार असल्यामुळे उर्वरित आठ सदस्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची नियुक्ती केली करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
महापालिकेच्या २०१७ मध्ये निवडणुका असल्यामुळे या काळात नागपूर विकास आघाडीमध्ये असलेल्या प्रत्येक सदस्याला स्थायी समितीवर किंवा अन्य समितीवर काम करण्याची संधी मिळावी या उद्देशाने पूर्ण १६ नव्या सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे समितीवर वर्णी लागावी यासाठी इच्छुक सदस्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह वाडा आणि बंगल्याच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत वाढवण्यासाठी आणि अभ्यासून सदस्यांची नियुक्ती व्हावी असा सत्तापक्षाचा प्रयत्न असला तरी सध्या आरोग्य सभापती रमेश सिंगारे यांच्या नावाची चर्चा आहे. गेल्यावेळी त्यांना स्थायी समिती सभापतीपद देऊ, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आश्वासन दिले होते. मात्र, मात्र ऐनवेळी नरेंद्र बोरकर यांची वर्णी लागली. याशिवाय कर समितीचे सभापती गिरीश देशमुख, गोपाल बोहरे, नीता ठाकरे यांच्या नावाची सभापतीपदासाठी चर्चा आहे. गिरीश देशमुख यांचे सत्तापक्षाचे नेते म्हणून नाव समोर आलेले असताना त्या जागेवर दयाशंकर तिवारी यांची नियुक्ती झाली. त्यामुळे सभापतीपदी गिरीश देशमुख यांची वर्णी लागण्यासाठी महापालिकेचा एक गट प्रयत्न करीत आहे. देशमुख यांच्याकडे सध्या कर समिती सभापती म्हणून जबाबदारी आहे.
महिला नगरसेविकांमध्ये नीता ठाकरे, अश्विनी जिचकार, नीलिमा बावणे यांनी स्थायी समितीवर वर्णी लागावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. गेल्यावेळी महापौरपदाच्या निवडणुकीच्यावेळी सर्व महिला नगरसेविकांनी भाजपचे नेते नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. महिलांना स्थान मिळावे हे लक्षात घेऊन नीता ठाकरे यांचे नाव समोर केले जाण्याची शक्यता आहे. एकदा स्थायी समितीसाठी आलेली नावे दुसऱ्यांदा येऊ नये, अशी पक्षाच्या ससंदीय मंडळाची भूमिका आहे. त्यामुळे  आघाडीमधील अपक्ष नगरसेवकांची वर्णी लागू शकते.
स्थायी समितीच्या सभापतीपदाचा कार्यकाळ संपत असताना हे पद कोणाकडे जाईल, अशी महापालिका वर्तुळात चर्चा आता रंगू लागली आहे. भाजप नगरसेवकांच्या या भूमिकेमुळे सत्तापक्षातील वरिष्ठांची डोकेदुखी वाढली असली तरी शेवटी नावे मात्र वाडा किंवा बंगल्यातून ठरवले जातील.