स्थायी समितीच्या आठ जागांवरील नियुक्त्या बुधवारी (२० फेब्रुवारी) होणार असून या निवडीच्या निमित्ताने सर्वच पक्षांमधील गटा-तटांच्या राजकारणाला उधाण आले आहे. भाजपचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे प्रत्येकी दोन आणि शिवसेनेचा एक असे आठ सदस्य स्थायी समितीमध्ये जाणार आहेत.
स्थायी समितीमधील आठ सदस्यांना चिठ्ठय़ा काढून निवृत्त करण्यात आले. त्यात भाजपचे तीन, काँग्रेसचे दोन आणि मनसे, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश होता. या आठ सदस्यांच्या निवृत्तीनंतर आता त्या त्या पक्षाला तेवढय़ा जागा स्थायी समितीमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे स्थायी समितीमध्ये जाण्यासाठी इच्छुकांकडून गेले काही दिवस जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. प्रत्येक पक्षातील नेत्यांचे काही गट असल्यामुळे स्थायी समितीमध्ये आपला नगरसेवक जावा यासाठी नेते प्रयत्न करत असून त्यात कोणाला यश येणार ते बुधवारी समजणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुकांकडून अर्ज मागवले होते. पक्षाकडे चौदा नगरसेवकांचे अर्ज आले असून त्यातून फक्त एकाच सदस्याची निवड करायची असल्यामुळे नेतृत्वासाठी ते आव्हान ठरणार आहे. भाजपच्या सदस्यांची निवड करताना नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, तसेच आमदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ यांच्या समर्थकांपैकी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. भाजपचे तीन सदस्य स्थायी समितीत जाणार असल्यामुळे एका नगरसेविकेला निश्चितपणे संधी मिळेल, अशी चर्चा आहे.
काँग्रेसमध्ये नव्यांसह जुने, अनुभवी असे आठ ते दहा नगरेसवक इच्छुक असून त्यातून दोन जणांची निवड होणार आहे. मनसेचा एक सदस्य स्थायी समितीमध्ये जाणार असून पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडूनच ते नाव निश्चित होणार आहे. शिवसेनेतही तीन-चार जण इच्छुक आहेत. त्या सदस्याची अंतिम निवड उद्धव ठाकरे यांच्याकडूनच होईल.