धर्माच्या नावाखाली स्थानिक विकास निधीचे विभाजन करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांमार्फत होत आहे. आमदार कुण्या जातीचे किंवा धर्माचे प्रतिनिधित्व करत नाही. त्यामुळे आमदारांचा विकासाचा निधी हा विशिष्ट धर्माच्या नावाखाली वापरण्याचा नवा पायंडा भाजप नेत्यांकडून रचला जात आहे. ही गंभीर बाब असून याची राज्य शासनाने दखल घेण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे.
येथील भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ उद्या मंगळवारी होत आहे. यासाठी थेट श्रीराम व येथील ग्रामदैवत राजराजेश्वर यांच्या चित्राचा वापर करून राजकारण सुरू झाले आहे. अकोला पश्चिम मतदार संघातील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी या धार्मिक चित्रांचा सर्रास वापर सुरू केला गेला आहे. या सर्व प्रकारातून विशिष्ट धर्माला झुकते माप दिल्याचे स्पष्ट होत आहे. आमदारांच्या स्थानिक विकास निधीचा वापर करताना तो विशिष्ट धर्मासाठी वापरण्यात येत असल्याचा भास निर्माण केला जात आहे. हा प्रकार दुर्दैवी असून याचा वापर टाळता आला असता. भाजप खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते या कामांचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर राहणार आहेत.
प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार डॉ.रणजित पाटील, आमदार गोपीकिशन बाजोरिया राहणार आहे. या यादीत जिल्ह्य़ातील भाजप आमदार हरिष पिंपळे यांचा पक्षाला विसर पडला, तर अकोला शहर सुधार समितीचे अध्यक्ष सुनील मेश्राम यांना यातून वगळल्याची माहिती मिळाली. याबाबतची नाराजी अनेकांनी खाजगीत व्यक्त केली. या उद्घाटन सोहळ्यात अकोला पश्चिम मतदार संघातील विविध रस्ते, विविध प्रभागातील १२ सभागृह, पाच वाचनालये, व्यायाम शाळा, मल्टिजीम व्यायाम साहित्य वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान, याविषयी भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही.