आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या मुद्यावर मते जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीत स्थानिक नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने काही वेळ या बैठकीतील वातावरण तंग झाले होते, अशी माहिती आता समोर आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीला अद्याप वर्षभराचा अवकाश असला तरी काँग्रेसने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात निरीक्षक पाठवून स्थानिक नेत्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत. या निरीक्षकांच्या अहवालाच्या आधारे आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मतदारसंघनिहाय बैठकांचे आयोजन केले आहे. या लोकसभा मतदारसंघातील नेत्यांना काल मंगळवारी सायंकाळी मुंबईत वर्षां बंगल्यावर बोलावण्यात आले होते. रात्री उशिरा सुरू झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे सुद्धा हजर होते. यावेळी नेत्यांमध्ये चांगलीच तू तू मै मै झाल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीला पालकमंत्री संजय देवतळे, माजी खासदार नरेश पुगलिया, आमदार सुभाष धोटे, वामनराव कासावार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, शहर अध्यक्ष गजानन गावंडे, महापौर संगीता अमृतकर, स्थायी समितीचे अध्यक्ष नंदू नागरकर, युवक काँग्रेसचे शिवा राव हजर होते.
यावेळी पुगलिया यांनी पालकमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर तोफ डागली. देवतळे जिल्ह्य़ातील सर्व नेत्यांना विश्वासात घेत नाहीत. त्यांच्यासोबत केवळ तीन कार्यकर्ते असतात. पक्षाला त्यांचे कोणतेही योगदान नाही. प्रशासनावर त्यांची अजिबात पकड नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. सामान्य कार्यकर्त्यांची कामे होत नाही. स्थायी समितीच्या निवडणुकीत पालकमंत्र्यांनी बंडखोरांना साथ दिली. त्यामुळे पालकमंत्री बदलण्यात यावा, अशी मागणी पुगलियांनी यावेळी केली. गेल्या निवडणुकीत देवतळेंनी विरोधात काम केल्यामुळे आपला पराभव झाला, असेही पुगलियांनी यावेळी सांगितले.
त्याला उत्तर देतांना देवतळे यांनी आजवर सर्वाना विश्वासात घेऊन काम केले. पक्ष संघटनेसाठी वेळ देण्याची सुद्धा तयारी आहे. गेल्या वेळच्या पराभवाला आपण नाही, तर या जिल्ह्य़ात बंडाची संस्कृती रुजवणारे नेतेच जबाबदार आहेत, असा टोला त्यांनी यावेळी पुगलियांचे नाव न घेता लगावला. स्थायी समितीचे सभापती नागरकर हे अजूनही पक्षाचे कार्यकर्ते आहेत, असेही देवतळेंनी यावेळी सांगितले. येत्या लोकसभा निवडणुकीत कार्यक्षम उमेदवार द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. आमदार सुभाष धोटे व कासावार यांनी उमेदवारीसाठी कुणाचेही नाव न घेता कार्यक्षम उमेदवार पक्षाने द्यावा, अशी मागणी केली. बांगडे व नागरकर यांनी सुद्धा पराभूतांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली.
* आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी
* मुख्यमंत्र्यांचा सर्वाना सबुरीचा सल्ला
* किती काळ भांडणार -माणिकराव