विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी अद्याप आघाडी आणि महायुती होणार की नाही, या प्रश्नांची उत्तरे इच्छूक उमेदवारांसह कार्यकर्त्यांना मिळत नसल्याने जिल्ह्यातील सर्व राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या नजरा मुंबई येथे होणाऱ्या घडामोडींकडे लागल्या आहेत. हा सर्व पेच जितक्या लवकर मिटेल तितका अधिक वेळ प्रचारास मिळू शकेल अशी कार्यकर्त्यांची आशा आहे. परंतु पेच सुटण्याऐवजी अधिकाधिक गुंतागुंतीचा होत असल्याने त्याचे पडसाद स्थानिक पातळीवरही पडू लागले आहेत.
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर विधानसभा निवडणुकीतही त्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून जाहीरपणे घोषणा करण्यात आल्या. परंतु जागा वाटपावरच घोडे अडून बसल्याने आता महायुती होते किंवा नाही याविषयीची स्थिती अधांतरी झाली आहे. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेतेच याप्रकरणी अंतिम निर्णय घेणार असल्याने आणि मुंबईतच त्यासंदर्भातील सर्व घडामोडी होत असल्याने जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. युती न झाल्यास त्याचा स्थानिक पातळीवर आपल्या पक्षाला काय फटका बसू शकतो किंवा लाभ होऊ शकतो याविषयी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगू
लागली आहे.
प्रतिस्पध्र्यावर दबाव वाढविण्याच्या वरिष्ठ पातळीवरील रणनीतीचे स्थानिक पातळीवरही पडसाद उमटू लागले असून मागील निवडणुकीत भाजपसाठी सोडण्यात आलेल्या नाशिक पूर्व मतदारसंघात मंगळवारी शिवसेनेने मेळावा घेऊन केलेले शक्तिप्रदर्शन त्याचेच एक उदाहरण होय. सध्यातरी स्थिती अधांतरी असल्याने नेमकी कोणती भूमिका घ्यावी हे कार्यकर्त्यांना समजेनासे झाले आहे. त्यातच निवडणुकीच्या प्रचारासाठी मिळणारा कमी वेळ इच्छूक उमेदवारांना अस्वस्थ करत आहे.
युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांप्रमाणेच आघाडीच्या कार्यकर्त्यांची अवस्था आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे नेते आघाडी होईलच याची हमी देत असले तरी त्यासंदर्भात चर्चेची कार्यवाही सुरू होत नसल्याने कार्यकर्ते बेचैन आहेत. आघाडी आणि महायुती यांच्या भविष्यावरच जिल्ह्यातील काही इच्छूकाच्या उमेदवारीचेही भविष्य अवलंबून असल्याने सध्याच्या घटनांमुळे तेही धास्तावले आहेत.
या बिकट स्थितीमुळे स्थानिक पातळीवर इच्छूकांच्या प्रचाराचे मार्गही सध्या बंद झाले आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना केवळ मेळाव्यांवर भर द्यावा लागत असून भाषणांमध्येही सावधगिरी बाळगली जात असल्याचे दिसून येत आहे.