ट्रेन, बर्निग ट्रेन आणि आता चेन्नई एक्स्प्रेस अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देशातील सर्वात मोठे वाहतुकीचे साधन असणाऱ्या रेल्वेचा हमखास वापर होत आला आहे. अनेक चित्रपटांची सुरुवातच रेल्वेच्या दृश्याने तर शेवट रेल्वे स्थानकावर झालेला आढळतो. अशा रीतीने रेलगाडी ही व्यावसायिक चित्रपटांचा अविभाज्य घटक असली तरी ज्वलनशील बाब असल्याने चित्रपटाच्या रिळांना रेल्वेत कधीही प्रवेश नव्हता. त्यामुळे चित्रपटांत ट्रेन दिसत असली तरी ट्रेनमध्ये मात्र चित्रपट पाहता येत नव्हता. मात्र आता आधुनिक युगात डिजिटल तंत्रज्ञानामुळे फिल्म्सची रिळे कालबाह्य़ झालीच, शिवाय सहज उपलब्ध झालेल्या स्मार्ट मोबाइल्समुळे चित्रपट पाहत रेल्वे प्रवास करणेही शक्य झाले आहे. कर्जत / कसारा तसेच विरार मार्गावरून साधारण पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावरून रेल्वेने दररोज मुंबईत ये-जा करणारे अनेक चाकरमानी सध्या मोबाइलमधील स्मरणपट्टीवर असणारा एखादा चित्रपट पाहात प्रवासातील कंटाळा वजा करू लागले आहेत.
मध्य रेल्वेवरील अंबरनाथ-बदलापूर तसेच पश्चिम रेल्वेवरील वसई-विरार पट्टय़ातून दररोज लाखो चाकरमानी मुंबईत ये-जा करीत असतात. आठ तासांची नोकरी आणि तीन तासांचा रेल्वे प्रवास असा साधारण त्यांचा दिनक्रम असतो. अनेकांना नोकरीच्या आठ तासांपेक्षा रोजचा तीन तासांचा रेल्वे प्रवास जिकरीचा आणि त्रासदायक वाटतो. या कंटाळवाण्या प्रवासातही विरंगुळा शोधण्याचा प्रयत्न प्रवासी करीत असतात. अगदी सुरुवातीच्या काळात उपनगरी गाडीच्या डब्यांमध्ये रमी, मेंढीकोट असे पत्त्यांचे डाव रंगू लागले. आता लोकल गाडीत पत्ते खेळण्यास कायद्याने बंदी असली तरीही काहीजण पत्ते पिसत असतात. मात्र तुलनेने त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. रोजच्या प्रवासात ठराविक जागी बसून अथवा उभे राहून प्रवास करणाऱ्यांमध्ये मैत्रीची धागेही जुळतात. त्यातून एकमेकांची चेष्टामस्करी, विचारपूस करण्यात प्रवासाचा वेळ घालविणारेही अनेक असतात. पूर्वी क्रिकेटचे सामने असले की ग्रुपपैकी कुणीतरी एखादा ट्रॅन्झिस्टर आणे आणि दहा डोकी त्याभोवती कानात प्राण ऐकून स्कोअर ऐके. हेडफोनमुळे या सार्वजनिक श्रवणानंदाला वैयक्तिक पातळीवर आणून ठेवले. त्यामुळे आता ऐन गर्दीतही ‘इतरांचा आपल्याला आणि आपला इतरांना त्रास नको’ असा विभक्त भाव जपता येऊ लागला आहे. मोबाइलमुळे प्रवाशांच्या हाती खेळण्यासाठी एक खेळणेच मिळाले. अगदी सुरुवातीपासूनच व्हॅल्यू अ‍ॅडिशन म्हणून मोबाइलमध्ये एफएम रेडिओ होता. पुढे स्मरणपट्टीद्वारे एमपीथ्री स्वरूपातील गाणी ऐकणेही शक्य झाले. आता तर काय अवघ्या दोन इंची स्क्रीनवर मोठय़ा मैदानातला क्रिकेटचा सामना खेळणेही डिजिटली शक्य झाले आहे. त्याचीच पुढची पायरी म्हणजे अगदी संपूर्ण चित्रपटच स्मार्टफोनच्या स्क्रीनवर पाहता येऊ लागला आहे. त्यामुळे अप आणि डाउन मार्गावरील अनेक प्रवासी सध्या लोकलमधील वेळ सत्कार्यी लावत मोबाइलच्या माध्यमातून चित्रपट पाहण्याची हौस भागवून घेत आहेत..