अंबरनाथ एमआयडीसीत स्थानिकांना डावलल्याचा आरोप मनसे विद्यार्थी सेनेने केला आहे. ‘एमआयडीसी’चे कार्यकारी अभियंता भालचंद्र केंद्रे यांना यासंदर्भात एक निवेदन सेनेच्या वतीने देण्यात आले आहे.
अंबरनाथमधील आनंदनगर एमआयडीसी परिसरात स्थानिकांना डावलून इतरांना काम दिल्याची तक्रार मनविसेने केली आहे. ‘एमआयडीसी’मध्ये जमिनी देताना स्थानिकांना प्राधान्य देण्याचा नियम कंपन्यांना परिपत्रकाद्वारे लागू केला होता, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
येथील ७०० कंपन्यांमध्ये पात्रतेनुसार नोकऱ्या मागणाऱ्यांना कंपनी प्रमुखांची भेट घेण्यास सांगितली जात आहे. परंतु भेटीत उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. मनविसेचे शहराध्यक्ष धनंजय गुरव यांनी गुरुवारी कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिले. त्यात स्थानिकांना डावलणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. घडलेल्या प्रकारांमध्ये आपण जातीने लक्ष घालू. याविरोधात कारवाईचे अधिकार ठाणे विभागीय कार्यालयाला आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.