राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘कॅरिऑन’च्या मुद्दय़ावरून विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना घेराव करण्याचा प्रयत्न केला. काही महिन्यांपूर्वी कॅरिऑनसाठी संविधान चौकात स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ नागपूर युनिव्हर्सिटी (स्टोन) या संघनेच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी कॅरिऑनची मोहीम सुरू केली होती. त्यावेळी स्थानिक नेत्यांनी विद्यार्थ्यांना घेऊन स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. बुधवारी एनएसयूआयने विद्यापीठाच्या फाटकाला कुलूप ठोकले.
विद्यापीठावर दबाव वाढत गेल्याने विद्यापीठाने अधिष्ठाते आणि इतर प्राधिकरणांच्या सदस्यांची बैठक बोलावली होती. तसेच कॅरिऑनप्रश्नी विद्यार्थ्यांना काही आश्वासने देऊ केली होती. मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे काही ठोस घडू शकले नाही. त्यामुळे स्टोनच्या विद्यार्थ्यांनी आज कुलगुरूंना जाब विचारण्यासाठी विद्यापीठ गाठले. मात्र, त्याचवेळी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी स्टंटबाजी करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाच्या फाटकाला कुलूप ठोकून घोषणा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काही दिवसांपूर्वीच या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या गाडीवर शाई टाकण्यात आली होती. त्यातही याच संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले.
आकस्मिक गोंधळ घालून प्रशासनाला काही काळ धारेवर धरण्याचा प्रयत्न करण्यात आला. सीताबर्डी पोलिसांना यावेळी पाचारण करण्यात आले होते. मात्र, शिक्षणाची खरोखर कळकळ असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना भीक घातली नाही.