परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज तोडल्याप्रकरणी आमदार संजय जाधव यांनी शेतकऱ्यांसह जाऊन महावितरणच्या कार्यालयास गुरुवारी कुलूप ठोकले. वीजबिल वाटप न करता शेतक ऱ्यांच्या कृषीपंपाची वीज खंडित केली. बिलाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फटका बसला. ग्रामीण भागातल्या कृषीपंपाची वीज सुरळीत होईपर्यंत येथून मागे न हटण्याची भूमिका आमदार जाधव यांनी घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते.
परभणी तालुक्यातील कृषीपंपाची वीज महावितरणने खंडित केली. शेतकऱ्यांची वीजबिल भरण्याची इच्छा असूनही त्यांच्यापर्यंत बिले गेली नाहीत. हा महावितरणचा दोष आहे. असे असताना शेतकऱ्यांचीच वीज खंडित करणाऱ्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी आमदार जाधव यांनी केली. या वेळी जिंतूर रस्त्यावरील अधीक्षक अभियंता कार्यालयास कुलूप ठोकण्यात आले. मनपाचे शिवसेना गटनेते अतुल सरोदे, शहरप्रमुख रामप्रसाद रणेर आदींसह असंख्य शिवसैनिक या वेळी उपस्थित होते.
दुपारी तीनच्या सुमारास शिवसैनिकांनी या कार्यालयाचा ताबा घेतला. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर घालवून मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्यात आले. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चुकीचे खापर शेतकऱ्यांच्या माथ्यावर का, असा प्रश्न आमदार जाधव यांनी या वेळी विचारला. दरम्यान, या प्रकरणी सायंकाळी कोणताही तोडगा न निघाल्याने उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते.