त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागात ‘साजरी करू या दिवाळी निराधार-निर्धनांसमवेत’ या लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच व साप्ताहिक ‘लोकज्योती’ च्या उपक्रमानुसार सुमारे पाच हजार कपडय़ांचे वाटप करण्यात आले.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पत्र्याचा पाडा, मास्तरवाडी, खरोली, गोररेचा पाडा, धाडोशी व सामुंडी या सहा पाडय़ांतील आदिवासींना हे कपडे देण्यात आले. अचानक मिळालेल्या या भेटीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच कार्यकर्त्यांनी या आदिवासींशी गप्पा मारल्या. पाडय़ातील सोयी-सुविधांची माहिती घेतली. मंचने जमा केलेल्या साडय़ांमध्ये बहुतेक साडय़ा पाचवारी होत्या. आदिवासी महिलांनी ‘भाऊ, आम्ही अशा साडय़ा नेसत नाही’ असे सांगितल्यावर कार्यकर्त्यांनी, ‘राहू द्या तुमच्याकडेच, तुमची लेक-सून या वापरतील त्यांना द्या’ अशी समजूत काढली.
खरवली पाडय़ात धाडोसी गुंड यांचे त्यातल्या त्यात आर्थिकदृष्टय़ा बरे कुटुंब. आदिवासींबद्दल दाखविलेली आस्था, प्रेम याबद्दल मंचच्या कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार तर मानले. परंतु भोजनाचाही आग्रह धरला. ‘लोकधारा’ या संस्थेचे मििलद दीक्षित व वासंती दीक्षित यांचे या उपक्रमास सहकार्य लाभले. दीक्षित हे बाबा आमटे यांचे सक्रिय सेवाभावी कार्यकर्ते आहेत. लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचचे अध्यक्ष रमेश देशमुख, कार्याध्यक्ष शरद बुरकुले, उपाध्यक्ष डी. एम. कुलकर्णी, कार्यवाह द. म. कुलकर्णी, सहकार्यवाह एम. जी. कुलकर्णी आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला.