निम्न दर्जाची कामे करणाऱ्या कार्यकर्त्यांना इतरवेळी फारसा मानसन्मान मिळत नाही. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षातील अशा कार्यकर्त्यांचे भाव मात्र चांगलेच वधारले आहेत. प्रत्येक उमेदवार या कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याच्या सूचना पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांना देत आहेत.
प्रचारसभा आणि प्रचार मिरवणुकीमध्ये जास्तीत जास्त नागरिक असावे, असा प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराचा हेतू असतो. प्रत्येक पक्षातील पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते हे उमेदवारांच्या अधिक जवळचे असतात. तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांकडे विशेष लक्ष दिले जात नाही. त्यामुळे ते दुर्लक्षितच असतात. निवडणुकीच्या काळात उमेदवारांना या कार्यकर्त्यांची आठवण येते. किमान यानिमित्ताने तरी मानसन्मान मिळत असल्याचे पाहून मग हे कार्यकर्ते सुखावून जातात. इतरवेळी खर्च करण्यास हात आखडता घेणारे उमेदवारही निवडणुकीच्या काळात हाताच्या मुठा सैल करतात. त्यामुळे कार्यकर्त्यांची चंगळ असते.
या कार्यकर्त्यांना प्रचारासाठी दोन वेळचे भोजन व इतर खर्च दिला जातो. किमान जवळचा खर्च होत नसल्याचे समाधान बाळगून हे कार्यकर्ते मग उमेदवारांच्या मागे फिरण्यास तयार होतात. जेथे जेथे उमेदवार जातो किंवा जशा सूचना मिळतात, तसे काम कार्यकर्ते करीत असतात. सर्वसाधारणपणे सकाळी ८ वाजेपासून प्रचाराची मिरवणूक सुरू होते. मिरवणूक कोणत्या भागातून जाणार याची पूर्वतयारी आधल्या दिवशीच केली जाते. तशा सूचना मग कार्यकर्त्यांना केल्या जातात. त्यानुसार कार्यकर्ते वेळेवर गोळा होतात. त्यांच्या मोटारसायकलींमध्ये पेट्रोल टाकण्याची व्यवस्था केली जाते. सकाळी ८ ते दुपारी १२-१ वाजेपर्यंत मिरवणूक असते. या दरम्यान ठिकठिकाणी लहान सभा घेतल्या जातात. सकाळच्या प्रचाराची फेरी संपल्यानंतर कार्यकर्त्यांना एका विशिष्ट ठिकाणी भोजन दिले जाते.
प्रचाराचा दुसरा टप्पा दुपारी ३ नंतर सुरू होतो. रात्री १० वाजता दुसऱ्या  प्रचार संपतो. गेल्या आठ दिवसांपासून ही प्रक्रिया सतत सुरू आहे. त्यामुळे उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांच्याही झोपा उडल्या आहेत. विशेष म्हणजे प्रचाराच्या धामधुमीत उमेदवाराला आरोग्याच्या दृष्टीने सुदृढ राहणे आवश्यक असते. त्यासाठी योग्य आहारावर त्यांचा कटाक्ष असतो. या प्रचारादरम्यान पाय दुखणे, संपूर्ण अंग दुखणे, घसा कोरडा होणे, झोप व्यवस्थित व पूर्ण न झाल्यामुळे चिडचिडेपणा येणे आदी आजार निर्माण होतात. दुसऱ्या दिवशी पुन्हा पहिल्यासारखेच ताजेतवाणे होऊन प्रचार करावा लागत असल्याने उमेदवार क्षुल्लक बाबींकडे दुर्लक्ष करतात. विशेषत प्रचारादरम्यान कुठे, केव्हा आणि काय बोलावे, याचे भानही ठेवून मतदारांची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न करावा लागतो.
प्रचाराच्या काळात उमेदवारांना कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवावा लागतो. कार्यकर्ते विश्वासू असले तर संपूर्ण काम व्यवस्थित पार पडते. त्यामुळेच निवडणूक प्रचार, भोजन, साहित्य, निवडणूक खर्च आदी समित्या स्थापन केल्या जातात. क्षमतेनुसार कार्यकर्त्यांकडे काम वाटून दिले जाते. विशेषत निवडणूक खर्चाचे काम उमेदवार नात्यातीलच कुणाकडे तरी सोपवतो. अपवाद वगळताच ती जबाबदारी विश्वासू कार्यकर्त्यांकडे सोपवली जाते. या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्ते मजेत असतात, एवढे मात्र खरे.