लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात विविध माध्यमांतून दररोज भेटणारे सर्व उमेदवार सध्या प्रचाराचा शीण घालविण्यात मग्न आहेत. मतमोजणी अवघ्या सात दिवसांवर आली असूनही तिचा कोणावर ताण नसल्याचे दिसते. उलट, प्रचार व मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कोणी कुटुंबीयांसमवेत विश्रांती घेत आहे, तर कोणी आपल्या दैनंदिन कामाला लागले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला नसताना काही उमेदवार तर थेट विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. प्रचारामुळे घरच्या रेंगाळलेल्या कामांवर कोणी लक्ष केंद्रित केले आहे, तर कोणी प्रचारात सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानणे, पक्ष कार्यात गुंतले आहे. सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा असा विविधांगी दिनक्रम आहे.

क्षणभर विश्रांतीकडे कल..
मतदानानंतर सलग दोन दिवस भुजबळ फार्म तसेच राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. विधानसभा मतदारसंघनिहाय कसा प्रतिसाद मिळाला, काय कामे केली आदींची माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली. त्यानंतर मुंबई येथे पक्ष कार्यालय तसेच मंत्रालयात दौरा झाला. आचारसंहिता शिथिल झाल्यामुळे मधल्या काळातील प्रलंबित कामांचा निपटारा केला. काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला. त्यानंतर दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली. सध्या राज्याबाहेर पाच-सहा दिवसांसाठी कुटुंबासमवेत विश्रांतीसाठी थांबलो आहे.
छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस)

विधानसभेची तयारी सुरू
खासदारकीची निवडणूक लढवली असली तरी सध्या मी व माझी पत्नी नगरसेवक म्हणून काम पाहत आहे. यामुळे निवडणूक काळात काही रेंगाळलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा सुरू आहे. बुधवारी सातपूर प्रभागातील विविध उद्यानांची पदाधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईला रवाना झालो. तेथे प्रदेश अध्यक्ष विलास गरुड यांची भेट घेत स्थितीची माहिती दिली. पक्षाने सध्या विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. त्यादृष्टीने विधानसभेसाठी १५ उमेदवार ठरले आहेत. त्यांच्यासोबत काम सुरू आहे. दुसरीकडे, निवडणूक काळात ज्यांनी मदत केली, त्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीवर जोर आहे. मतदानानंतर कार्यकर्त्यांची जिल्हा तसेच ग्रामीण भागात चाचपणी सुरू असून कुठे कसा प्रतिसाद मिळाला, यावर दूरध्वनीवर चर्चा सुरू राहते. पक्षाच्या कामात सक्रिय असून दैनंदिन व्यवहार सुरू आहेत. मतपेटय़ा ज्या ठिकाणी ठेवल्या आहेत, त्या ठिकाणी फिरकलो पण नाही. कारण निवडणूक काळातील गैरव्यवहारांची कोणी चौकशी केली नाही, तर तेथील कारभाराची कोण करणार?
दिनकर पाटील (बसपा)

सध्या केवळ घरी लक्ष..
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत संपूर्ण चार महिने घराबाहेर राहिल्याने घरातील अनेक कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर काही दिवस गावाला शेतीच्या कामासाठी आलो आहे. पक्षाची सर्व कामे जिल्हा कार्यकारिणी पाहत आहे. त्यांची विविध कामे, कार्यक्रम सुरू असून सध्या पक्षांच्या कोणत्याही कार्यक्रमांशी माझा संबंध नाही. घराकडे पाहणे सध्या गरजेचे असल्याने मी इकडे आलो आहे.
विजय पांढरे (आम आदमी)

चार महिन्यांतील दुर्लक्ष भरून काढण्यावर भर
मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर संपूर्ण लक्ष या चार महिन्यांत रुग्ण आणि हॉस्पिटलकडे झालेल्या दुर्लक्षावर केंद्रित केले आहे. यामुळे दैनंदिन व्यवहारात नियमित सराव, रुग्णांची तपासणी, शस्त्रक्रिया सुरू आहेत. राजकीय कार्यक्रम किंवा पक्ष कार्यक्रम पातळीवर सध्या शांतता आहे. निवडणुकांशी संबंधित आवश्यक मतदार यादी, कार्यकर्त्यांची नावे दिली आहे. विधानसभानिहाय मतदार यादीचे काम पुन्हा सुरू झाले आहे. पक्ष कार्यालयात काही कार्यक्रम नसल्याने फेरफटका झाला नाही. प्रचाराच्या धावपळीनंतर विश्रांतीसाठी म्हणून बाहेर पडलेलो नाही. कुटुंबासमवेत बाहेर जायला आवडेल, पण त्यासाठी नियोजन हवे. ते नियोजन करण्यास सध्या वेळ नाही. मतपेटय़ा ज्या ठिकाणी ठेवल्या आहेत, त्या ठिकाणची पाहणी केली नाही. कारण त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती बदलेल असे मला वाटत नाही. निवडणूक शाखेने केलेली तयारी, त्यांची यंत्रणा यावर माझा विश्वास आहे.
डॉ. प्रदीप पवार (मनसे)

दैनंदिन कामकाज सुरू
 मतदान संपल्यानंतर प्रभागातील विविध कामांवर लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांच्या अडचणी, समस्या सोडवण्याकडे भर आहे. याशिवाय दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. पक्ष कार्यालयात दररोज सकाळी होणाऱ्या बैठकीला आपण हजर असतो. त्यामुळे पक्षातील कामकाजात तसेच दैनंदिन कामात सक्रिय असल्याने विश्रांती घ्यायला वेळ नाही. मतपेटय़ा ज्या ठिकाणी ठेवल्या आहेत, तो संपूर्ण बंदिस्त परिसर आहे. त्यामुळे आत काय चालते हे कोणाला माहीत? त्या बंद दारावर विश्वास ठेवावाच लागेल.
अॅड. तानाजी जायभावे (माकप)

भेटी-गाठी सुरूच
निवडणुकीचा दुसरा टप्पा म्हणजे मतदान झाल्यानंतर विश्रांती न घेता दैनंदिन व्यवहार नियमितपणे सुरू केले. निवडणुकीच्या काळात ज्या कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी पक्षाला तसेच मला मदत केली त्यांचे सार्वजनिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आभार मानत आहे. याशिवाय कोणाकडे लग्न समारंभ, दु:खद घटना असतील, त्या ठिकाणी व्यक्तिश: भेट देत आहे. मधल्या काळात काही ठिकाणी सहकुटुंब देवदर्शनही करून आलो. पक्षाच्या कार्यालयात फेरफटका असतो. मतपेटय़ा ज्या ठिकाणी ठेवल्या आहेत, त्या ठिकाणी खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या समवेत भेट दिली. तेथील सुरक्षा व्यवस्थेबद्दल समाधानी आहे. मात्र तेथे बसविलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील हालचाली या उमेदवारांच्या भ्रमणध्वनीमध्ये दिसाव्यात यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
हेमंत गोडसे (शिवसेना)