शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कोलांटउडीमुळे शिवसेनेने लगेचच उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. बुधवारी मुंबईत ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: त्यादृष्टीने चाचपणी केली. त्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सदाशिव लोखंडे व सेवानिवृत्त अधिकारी लहू कानडे यांच्या नावांवर खल सुरू असून, पक्षाच्या स्थानिक पदाधिका-यांसह हे दोघेही या बैठकीला उपस्थित होते.
वाकचौरे यांनी अपेक्षेप्रमाणे अखेर काँग्रेसची वाट धरली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीनंतर मंगळवारी वाकचौरे यांनी पक्षांतरावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या या निर्णयाची शिवसेनेत तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, ठाकरे यांनी रात्रीच स्थानिक पदाधिका-यांशी संपर्क साधून बुधवारी मुंबईत चर्चेला बोलावले होते. त्यानुसार झालेल्या बैठकीला ठाकरे तसेच सुभाष देसाई, लीलाधर डाके, जिल्ह्य़ाचे संपर्कप्रमुख सुहास सामंत यांच्यासह आमदार अशोक काळे, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे (दक्षिण), रावसाहेब खेवरे (उत्तर), उपजिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, अनिल कराळे, चंद्रशेखर बोराळे तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुकाप्रमुख या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीला सदाशिव लोखंडे व लहू कानडे हे दोन्ही इच्छुक उपस्थित होते असे समजते. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चाही केल्याचे समजते. याशिवाय भारिपचे (आठवले गट) नेते अशोक गायकवाड हेही शिर्डी लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. मात्र ही जागा भारिपला गेली असती तर त्यांचा दावा अधिक मजबूत ठरला असता असे सांगण्यात येते.
 उद्धव ठाकरे यांनी या जागेसाठी सर्व ताकद पणाला लावण्याचे आवाहन या वेळी पदाधिका-यांना केले. उमेदवारीचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करण्याचेही सूतोवाच ठाकरे यांनी या बैठकीत केले. दरम्यान, प्रा. गाडे यांनी वाकचौरे यांचे पक्षांतर ही त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल असे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. शिवसैनिकांनी गेल्या वेळी जिवाचे रान करून त्यांना निवडून दिले होते, तेच शिवसैनिक पुन्हा जिवाचे रान करून आता त्यांना घरी पाठवतील असे ते म्हणाले.