देशातील जनतेवर होणारा अन्याय, अत्याचाराची कणव लोकमान्यांना होती आणि त्यांच्या डोळ्यातून ते प्रकर्षांने जाणवायचे. टिळक ज्या ठिकाणी जात त्याठिकाणी शेकडो लोक त्यांना भेटण्यासाठी यायचे. लोकांचे दु:ख टिळकांना जाणवायचे. ब्रिटिश सत्तेने केलेल्या अत्याचाराची आपणास कल्पना आहे आणि ही सत्ता उलथून टाकण्यासाठी मी कोणते प्रयत्न करतो ते तुम्ही पाहाच, हा निग्रह टिळकांच्या व्यक्तिमत्त्वातून सतत जाणवायचा. ‘लोकमान्य एक युग पुरुष’ साकारताना टिळकांची हीच भावना समजून घेतल्यामुळे त्यांच्यासारखे भाव डोळ्यात आणण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला, असे मत लोकमान्य टिळकांची भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावे याने व्यक्त केले.
रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेची सांगता ‘लोकमान्य एक युग पुरुष’ या चित्रपटातील कलाकारांशीच्या संवादाच्या कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमास अभिनेते सुबोध भावे, दिग्दर्शक ओम राऊत, सहकलाकार अंगद म्हैसकर आणि रंगभूषाकार विक्रम गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी वृत्तनिवेदक मिलिंद भागवत यांनी या कलाकारांशी संवाद साधला. सुबोध भावे याने यावेळी टिळकांच्या सर्वगुण संपन्नतेचा उल्लेख करून त्यांच्या वैशिष्टय़ांची ओळख करून दिली. टिळकांनी खगोलशास्त्राचा अभ्यासक केला. ते गणितज्ञही होते. टिळकांचा ग्रहताऱ्यांचा वेगळा अभ्यास असला तरी या सगळ्याचा उपयोग त्यांनी देश कार्यासाठी केला. खगोलशास्त्र येत होते म्हणून त्यांनी त्याचे भांडवल करून वेगळा व्यवसाय सुरू केला नाही. त्याकाळी ब्रिटिश भारतीयांना अडाणी, मागासलेले म्हणायचे. शिवाय तुम्ही कुणावरही राज्य करण्यास लायक नाही तर तुम्ही गुलाम म्हणूनच योग्य आहात असे हिणवायचे. खगोल शास्त्राचा अभ्यास करून त्यांनी ब्रिटिशांची ही कल्पना खोडून टाकण्यासाठी प्रयत्न केला. ब्रिटिशांच्या मूळ पुरुषांपेक्षाही ८०० वर्षांपूर्वीचा भारत किती प्रगत होता, हे सांगण्यासाठी त्यांनी या ज्ञानाचा पुरेपूर वापर केला. टिळकांनी गणिताचा अभ्यास राजकीय व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी केला. सध्याच्या प्रचलित राजकारणाचा अभ्यास केला तर राजकारणाची सुरुवात करण्याचा मान टिळकांना जातो. राजकारणाची व्याप्ती समजून घेऊन एक समाज व्यवस्था जागी करणे, समाजावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून देणे आणि त्या विरोधात लढण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे हे सगळे त्यांनी गणिताचा आधार घेऊनच केले. गणेशोत्सव, शिवजयंती सुरू करून त्याचा वापर नेमकेपणाने त्यांनी केला. टिळकांची विविधांगी ओळख यानिमित्ताने सुबोध याने केली. मंडालेच्या तुरुंगात जाण्यापूर्वी खटल्यात सुमारे २१ तास टिळकांनी स्वत: युक्तिवाद केला होता. तरीही जामीन मंजूर करून घेण्याची विनंती केली होती. मात्र टिळकांनी त्याला नकार दिला होता, असेही भावे यांनी स्पष्ट केले.