काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असताना भाजपच्या आघाडीवर मात्र अजूनही आनंदीआनंद आहे. अनेकांना खासदारकीचे डोहाळे लागले असले, तरी कोमेजलेल्या ‘कमळा’त बळ येण्यासाठी पक्षाने एखाद्या डॉक्टरचे ‘टॉनिक’ वापरण्याचा प्रयोग करावा, असा मतप्रवाह पुढे आला आहे.
सध्या जवळपास सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. विविध विकासकामांची उद्घाटने, भूमिपूजन सोहळे, वेगवेगळय़ा समाजावर आश्वासनांची खैरात करून जिल्ह्यात काँग्रेसने तयारीचे संकेत दिले आहेत. काँग्रेसतर्फे उमेदवारीचा प्रश्न फारसा महत्त्वाचा नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ज्यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवतील त्याची उमेदवारी निश्चित हे स्पष्ट आहे. विरोधी पक्षाकडे सध्या तरी प्रबळ दावेदार नाही, याची जाणीव असूनही काँग्रेसने तयारी सुरू केली असली, तरी भाजपमध्ये मात्र अजूनही शांतता आहे.
भाजपमध्ये संभाजी पवार, राम पाटील रातोळीकर, लक्ष्मण ठक्करवाड, डॉ. अजित गोपछडे यांच्या नावांची चर्चा आहे. गोपछडे वगळता पवार व रातोळीकर यांच्यावर काँग्रेसचा, तर ठक्करवाड यांच्यावर जनता दलाच्या विचारांचा प्रभाव आहे. अन्य इच्छुक डॉ. धनाजीराव देशमुख यांना पक्षाने दोनदा संधी दिली. पण त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला. भाजपमध्ये ज्यांच्या नावाची चर्चा आहे, त्यापकी डॉ. गोपछडे गेल्या २० वर्षांपासून सक्रिय आहेत. वेगवेगळय़ा सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग आहे. शिवाय यापूर्वी दोनदा पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी पक्षाच्या उमेदवारासाठी जिवाचे रान केले होते. परंतु सातत्याने पात्रता, निष्ठा, कर्तृत्व असूनही डावलले गेल्याने यंदा त्यांच्या समर्थकांना मोठय़ा आशा आहेत. डॉ. गोपछडे यांनीही पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवण्याचे संकेत देताना ‘नवीन प्रयोग’ व्हायला हरकत नाही. मलाच म्हणून नाहीतर एखाद्या नवख्याला संधी दिल्यास काँग्रेसविरोधी लाट ‘कॅश’ करता येऊ शकते, याकडे पक्षनेत्यांचे लक्ष वेधले.
भाजप कार्यकर्त्यांनाही ‘नवीन प्रयोगा’ची अपेक्षा आहे. सध्या पक्षात मरगळ आहे. गट-तटाच्या राजकारणात पक्ष विखुरला गेला आहे. ज्यांना पक्षाने मोठे केले तेच आज पक्षापासून दुरावले आहेत. अशा स्थितीत भाजपमध्ये चतन्य आणण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी नवीन प्रयोग करावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. नांदेड जिल्ह्यात ‘नवीन प्रयोग’ केल्यानंतर डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या रूपाने अलीकडच्या काळात पहिल्यांदा विरोधी पक्षाचा खासदार झाला होता. डॉ. गोपछडे पक्षाकडे इच्छुक आहेत, शिवाय पक्षाच्या काही जुन्या कार्यकर्त्यांना डॉ. माधवराव किन्हाळकर यांचे नावही आवश्यक वाटते. डॉ. किन्हाळकरांनी भाजपकडून अजून निवडणूक लढविण्याची जाहीर इच्छा व्यक्त केली नाही. पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना गळ घातली तर काँग्रेससमोर चांगला पर्याय निर्माण होऊ शकतो, असे सांगण्यात आले.
डॉ. किन्हाळकर यांच्यासह डॉ. दापकेकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. कंधार तालुक्यातील मूळ रहिवासी असलेल्या पुणे येथील बांधकाम व्यावसायिकाच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. भाजपच्या मराठवाडा पातळीवरील पदाधिकाऱ्यांची बठक उद्या (मंगळवारी) औरंगाबादेत होत आहे. मराठवाडय़ातल्या ८ पकी ४ जागा भाजपच्या वाटय़ाला आहेत. पण पक्षाचे नेते केवळ जालना व बीडपुरताच विचार करतात, अशी भावना आहे. राष्ट्रीय पक्ष अशी ओळख असताना, दिल्लीचे तख्त काबीज करण्याची तयारी केल्याचे नेते सांगत असताना पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येक जागेचा विचार करणे आवश्यक असल्याचे सांगून नांदेडबाबत आतापासूनच व्यूहरचना करण्याची गरज असल्याचे एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.