मुलांच्या शिक्षणासाठी पैसे साठवताना विमा घ्यावा की म्युच्युअल फंडात पैसे टाकावेत? भविष्यासाठी पैसे गुंतवताना घर-जागेत पैसे गुंतवणे अधिक फायदेशीर की पेन्शन योजना बरी? अनंत गरजा पण मर्यादित उत्पन्नाचा मेळ कसा घालावा त्यातून आर्थिक परिस्थिती कशी सावरता येईल हा सर्वसामान्यांना पडणारा नेहमीचा प्रश्न. या सर्व प्रश्नांची उत्तरे कोणतेही शुल्क न भरता थेट नामांकित तज्ज्ञांकडून जाणून घेण्याची सुवर्णसंधी ठाणेकरांना शुक्रवारी ‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’च्या प्रकाशनाच्या निमित्ताने मिळणार आहे.
नव्या आर्थिक वर्षांपासून सुरू होत असलेल्या विविध गुंतवणूक-बचत योजना तसेच नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या कर सूट – सवलती याविषयीचे सविस्तर विवेचन यंदाच्या ‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’ विशेषांकात आहे. ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत व ‘नातू परांजपे – इशान ड्रिम बिल्ड प्रा. लि.’ आणि ‘कोटक म्युच्युअल फंड’ सह प्रायोजक असलेला हा अंक शुक्रवारी, २७ मार्च रोजी प्रकाशित होत आहे. सायंकाळी साडेसहा वाजता ठाण्यातील ‘हॉटेल टिप टॉप प्लाझा’मध्ये कर सल्लागार जयंत गोखले, गुंतवणूकतज्ज्ञ अजय वाळिंबे ही तज्ज्ञ मंडळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
’अर्थसंकल्पात मूळ प्राप्तीकर मर्यादा कायम असली तरी तब्बल ४.४४ लाख रुपयेपर्यंतचे कर सवलत आहे. याचा पुरेपूर लाभ कसा घेता येईल? याचा आलेख जयंत गोखले मांडतील.
’राष्ट्रीय निवृत्ती योजनेत पैसा गुंतवावा की ‘पीपीएफ’चा पर्याय अधिक चांगला, याची माहिती अजय वाळिंबे यांच्याकडून मिळेल.
’निवृत्तिवेतन, सोने, ऑनलाइन ट्रेडिंग, क्रेडिट रेटिंग हे विषय ठाणेकरांना समजून घेता येतील.
’प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रेक्षकांना या कार्यक्रमाला प्रवेश देण्यात येणार आहे.