वय कोणतेही असो माणसाची संवादाची भूक कायम असते. तरीही आजच्या काळात बदलत्या तंत्रामुळे, हातात आलेल्या अत्याधुनिक मोबाइल आणि संगणकीय अॅप्समुळे प्रत्यक्ष भेटीपेक्षाही ‘व्हच्र्युअल’ भेटीवर समाधान मानणाऱ्या पिढीने आयुष्यभरासाठी अशा इलेक्ट्रॉनिक सोबतीचा पर्याय निवडला आहे का?, या अशा गोष्टींवर संवादाची आणखी एक खिडकी खुली करून देणाऱ्या ‘व्हाईट लिली नाईट रायडर’ या नाटकाचे खास प्रयोग महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले आहेत. ‘लोकसत्ता’च्या सहकार्याने २३, २४, ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला चार महत्त्वाच्या रंगमंचावर ‘व्हाईट लिली नाईट रायडर’ या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. त्यामध्ये २३ सप्टेंबरचा पहिला प्रयोग सकाळी ११ वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे तर दुसरा प्रयोग २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी मंदिर येथे होणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ओळखपत्रे दाखवून एक तिकीट घेतले की एक तिकीट मोफत दिले जाणार आहे. ‘चॅट’ करताना सगळ्याच गोष्टींवर खुलेपणाने संवाद साधणारी आजची पिढी वास्तवात समोरासमोर आल्यावर नेमकं काय घडतं?, हे दाखवणारे आणि ते का घडतं?, याचा विचार करायला लावणारे हे नाटक आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता मिलिंद फाटक यांच्या या नाटकात मुख्य भूमिका आहेत. आत्तापर्यंत सर्वच वयोगटाला आलेल्या या नाटकावर तरूण पिढीची काय प्रतिक्रिया आहे हे आजमावण्याचाही हा एक प्रयत्न आहे. या खास प्रयोगासाठींची तिकीट विक्री सुरू झाली असून
www.ticketees.com या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंगही सुरू करण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 22, 2013 1:06 am