19 April 2019

News Flash

नाशिकमध्ये २३ जानेवारी ‘लोकसत्ता’ वक्तृत्व स्पर्धेची प्राथमिक फेरी

महाराष्ट्राला लाभलेली उत्कृष्ट वक्तृत्वाची परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी आणि कानाकोपऱ्यांत दडलेल्या तरुण वक्त्यांना शोधून त्यांच्या भाषण

| January 17, 2015 01:48 am

महाराष्ट्राला लाभलेली उत्कृष्ट वक्तृत्वाची परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी आणि कानाकोपऱ्यांत दडलेल्या तरुण वक्त्यांना शोधून त्यांच्या भाषण कौशल्याला वाव देण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेसाठी जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेची नाशिक विभागाची प्राथमिक फेरी २३ जानेवारी दुपारी दोन वाजता गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे होणार आहे.
नाथे प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाईस यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेला जनकल्याण सहकारी बँक लिमिटेडची मदत झाली आहे. स्पर्धेस शहराबरोबर ग्रामीण भागातून प्रतिसाद लाभला. मालेगाव, कळवण, चांदोरी, सिन्नर, सटाणा, देवळा आदी ठिकाणाहून १४ महाविद्यालयातून २६ स्पर्धक तर शहर परिसरातील १६ विद्यालयांमधून २८ स्पर्धक असे जिल्ह्यातील एकूण ३० महाविद्यालयातून ५४ स्पर्धक आपल्या वक्तृत्व कलेचा प्रत्यय देतील. स्पर्धेत १६ ते २४ वयोगटातील स्पर्धक सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी सामाजिक चळवळींचा राजकीय परिणाम, अतिसंपर्काने काय साध्य?, जगण्याचे मनोरंजनीकरण, आपल्याला नायक का लागतात? आणि जागतिकीकरणात देश संकल्पना किती सुसंगत हे विषय आहेत.
नाशिक विभागातून दोन विभागीय विजेते निवडले जातील. ही विभागीय अंतिम फेरी ३ फेब्रुवारी रोजी होईल. त्यातून निवडण्यात आलेला स्पर्धक १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. अंतिम विजेत्यास ‘वक्तादशसहस्त्रेषु’ म्हणून जाहीर केले जाईल. स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी वंदन चंद्रात्रे यांच्याशी ९४२२२ ४५०६५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

First Published on January 17, 2015 1:48 am

Web Title: loksatta oratory contest preliminary round held on 23 january in nashik