दहावी किंवा बारावीनंतर काय या गोंधळातून बाहेर पडून विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण व करिअरचा योग्य मार्ग निवडता यावा यासाठी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही कार्यशाळा २९ व ३० मे रोजी होणार आहे.
दहावीनंतर कला शाखेत जायचे की आईबाबा सांगताहेत म्हणून विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचा की मित्रमैत्रिणींचा वाणिज्य शाखेचा आग्रह म्हणून पुढची पाच वर्षे अकाऊंट्स शिकायचे. दहावीचा निकाल जसजसा जवळ येऊ लागतो तसतसा हा प्रश्न अधिकच गडद होऊ लागतो. पुढे अकरावीला प्रवेश घेतल्यानंतरही ही दोलायमान अवस्था संपत नाही. कारण, तेव्हा बारावीनंतर काय करायचे, या नव्या प्रश्नाने पिच्छा पुरविलेला असतो. आपला हा गोंधळ दूर करण्यासाठी या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना निश्चितच उपयोग होईल.
प्रभादेवीच्या ‘रवींद्र नाटय़ मंदिर’ येथे ही कार्यशाळा होईल. ही कार्यशाळा दोन दिवस असली तरी दोन्ही दिवसांचे विषय समान आहेत. विद्यार्थ्यांना-पालकांना आपल्या सोयीनुसार २९ किंवा ३० मे या कोणत्याही एका दिवशी यात सहभागी होता येईल. तज्ज्ञ मार्गदर्शक उच्चशिक्षण आणि करिअरच्या विविध दिशा विद्यार्थ्यांना दाखवतील. विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखांतील विविध अभ्यासक्रमांचे पर्याय विद्यार्थ्यांसमोर असतात. त्यांची प्रवेश प्रक्रिया, शुल्क अशा अनेक गोष्टी माहिती करून घेऊन त्याप्रमाणे निर्णय घ्यायचा असतो. या कार्यशाळेत या संबंधीची माहिती विद्यार्थ्यांना मिळविता येईल. प्रत्येक सत्रानंतर विद्यार्थ्यांना आपल्या प्रश्नांचे निरसनही करून घेता येईल. या कार्यशाळेत विविध अभ्यासक्रम, शैक्षणिक संस्था यांची माहिती देणारे स्टॉल्स असतील.

कार्यशाळेतील विषय..
* आपले करिअर कसे निवडावे?
* ‘सॉफ्ट स्कील’चे महत्त्व आणि      ते विकसित करण्याचे तंत्र
* ‘विज्ञान-तंत्रज्ञान, वाणिज्य आणि कला’ या  शाखांमध्ये उपलब्ध असलेले अभ्यासक्रम    आणि करिअरच्या संधी
* तणावावर कशी मात करावी आणि निवडलेल्या क्षेत्रात यश कसे मिळवावे?

प्रवेशिका आजपासून
या कार्यशाळेसाठीच्या प्रवेशिका उपलब्ध असून त्यासाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येईल. सहभागी होणाऱ्यांसाठी भोजनाची सोय आहे. प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण – लोकसत्ता, मुंबई कार्यालय, दुसरा मजला, एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉईंट, किंवा लोकसत्ता कार्यालय, कुसुमांजली, दुसरा मजला, कॉसमॉस बँकेच्यावर, गोखले रोड, नौपाडा, ठाणे(प) किंवा रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी (सकाळी १० ते सायंकाळी ६) अधिक माहितीसाठी संपर्क-०२२/६७४४०३६९/३४७.