उपनगरीय रेल्वेमार्गाच्या हद्दीत लांब पल्ल्याच्या गाडय़ा येत असल्याने उपनगरीय रेल्वेमार्गावरील फेऱ्यांमध्ये अडथळा निर्माण होत असल्याने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात सॅटेलाइट टर्मिनसची घोषणा केली होती. त्यापैकी पनवेल येथील टर्मिनसची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून २०१८च्या अखेपर्यंत पनवेल टर्मिनसचे काम पूर्ण होणार आहे. हे टर्मिनस सुरू झाल्यानंतर दक्षिणेकडे जाणाऱ्या बहुतांश गाडय़ा मुंबईऐवजी येथूनच सोडण्याचा पर्याय रेल्वेकडे उपलब्ध असेल.
मुंबईसारख्या गजबजलेल्या उपनगरीय मार्गावर मेल-एक्स्प्रेस गाडय़ाही चालत असल्याने उपनगरीय फेऱ्यांची संख्या वाढवण्यावर मर्यादा येते. त्यात मध्य रेल्वेवर उपनगरीय जलद गाडय़ा व लांब पल्ल्याच्या गाडय़ा यांसाठी एकच मार्गिका असल्याने रात्री साडेआठनंतर आणि सकाळी दहानंतर उपनगरीय जलद गाडय़ांच्या फेऱ्यांची संख्या कमी होते. परिणामी लांब पल्ल्याच्या गाडय़ा उपनगरीय रेल्वेच्या हद्दीबाहेरून सोडण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सॅटेलाइट टर्मिनस ही संकल्पना मांडली. त्यात मुंबईत पनवेल, ठाकुर्ली आणि वसई या तीन ठिकाणी टर्मिनस उभारण्यावर भर देण्यात आला आहे.
त्यापैकी पनवेल टर्मिनसची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. या टर्मिनससाठी कळंबोली येथे ‘कोचिंग डेपो’ उभारण्याचे काम सुरू झाले आहे. या टर्मिनसच्या उभारणीसाठी ३८ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या कामात पनवेल येथील प्लॅटफॉर्मची लांबी वाढणार आहे. त्याशिवाय टर्मिनससाठी पादचारी पूल, रेल्वेमार्गावरील रस्ते पूल, भुयारी मार्ग आदी कामेही केली जाणार आहेत.
पनवेल टर्मिनसचे काम पूर्ण झाल्यावर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणाऱ्या आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा पनवेलहून सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपनगरीय मार्गावर या गाडय़ांसाठी राखीव असलेली वेळ उपनगरीय गाडय़ांसाठी वापरणे शक्य होणार आहे. परिणामी उपनगरीय मार्गावरील फेऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.