News Flash

मालेगाव मध्य मतदारसंघात रांगाच रांगा

मालेगाव मध्य मतदारसंघात मतदानासाठी रांगा लागल्या असताना शेजारील मालेगाव बाह्य़ मतदारसंघात मात्र तुलनेने कमी गर्दी दिसून आली.

| October 16, 2014 01:48 am

मालेगाव मध्य मतदारसंघात मतदानासाठी रांगा लागल्या असताना शेजारील मालेगाव बाह्य़ मतदारसंघात मात्र तुलनेने कमी गर्दी दिसून आली. दुपारी तीन वाजेपर्यंत मालेगाव मध्य मतदारसंघात ५३ तर बाह्यमध्ये ४५ टक्के मतदानाची नोंद झाली.
सकाळपासूनच मालेगाव शहर मतदारसंघात मतदार उत्साहाने घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसून आले. उमेदवारांचे समर्थक मतदारांना मतदानासाठी प्रेरित करत होते. मतदारसंघात एक लाख २७ हजार ७९ पुरूष तर एक लाख १५ हजार ८०५ महिला मतदार आहेत. मतदानासाठी पुरूषांपेक्षा महिलांमध्ये अधिक उत्साह दिसून आला. काँग्रेसचे आसिफ शेख, राष्ट्रवादीचे मुफ्ती मोहंमद यांच्यात प्रमुख लढत होत आहे. मालेगाव मध्य मतदारसंघात उत्साह ओसंडून वाहात असताना मालेगाव बाह्य मतदारसंघात परिस्थिती वेगळी दिसून आली. एक लाख ५८ हजार २२२ पुरूष, तर एक लाख ३९ हजार ७५७ महिला मतदार असलेल्या या मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यात प्रमुख लढत आहे. मालेगाव तालुक्यातील दाभाडी, पिंपळगाव, रावळगाव, वडनेर, खाकुर्डी, अजंग-वडेल, करंजगव्हण, वडगाव या सर्व ठिकाणी मतदारांमध्ये विशेष उत्साह दिसून आला नाही. मतदारांमध्ये निरूत्साह असण्याचे कारण दुष्काळी परिस्थिती हे दिले जात आहे. तालुक्यात समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पिके जगविण्यासाठी पाण्याची गरज असताना पाणी देता येणे अशक्य असल्याने पुढे कसे होणार, हा प्रश्न शेतकऱ्यांना महत्वपूर्ण वाटत आहे. त्यामुळे मतदानाकडे ग्रामीण भागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्यातच दीपावलीचा सण जवळ आल्याने सणाच्या तयारीतही शेतकरी मग्न असल्याने त्याचाही परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याचे म्हटले जात आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघात किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. आहे. हिरे घराण्यातील एकही उमेदवार रिंगणात नसलेली मालेगाव तालुक्यातील ही विधानसभेची पहिलीच निवडणूक ठरली आहे. हिरे घराण्यातील अव्दय हिरे यांनी नांदगाव मतदारसंघातून उमेदवारी केल्याने त्यांचे सर्व कार्यकर्ते नांदगावमध्ये प्रचारात गुंतले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 1:48 am

Web Title: long queues for voting seen in malegaon central constituency
Next Stories
1 मतदारराजाची आज परीक्षा
2 दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
3 लोकशाहीची लगीनघाई
Just Now!
X