शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणूक अधिक योग्य असून ती सेन्सेक्स किंवा निफ्टीमधील समभागात केल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते, असा सल्ला प्रसिद्ध गुंतवणूक विश्लेषक व्ही. के. शर्मा यांनी मंगळवारी बोरिवली येथे दिला.
‘लोकसत्ता’ आणि ‘सीडीएसएल’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘श शेअर बाजाराचा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. एचडीएफसी सिक्युरिटीज्ने हा कार्यक्रम प्रायोजित केला होता. शेअरबाजार सर्वाधिक उंचीवर असताना गुंतवणूकदारांनी कुठे गुंतवणूक करावी, काय पथ्ये पाळावीत आणि कोणत्या चुका टाळाव्यात याचे मार्गदर्शनही शर्मा यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘सीडीएसएल’च्या गुंतवणूक विभागाचे प्रमुख चंद्रशेखर ठाकूर यांनी ‘डीमॅट’विषयी माहिती दिली. गेल्या काही वर्षांत डीमॅट प्रणालीत झालेल्या सुधारणांचा आढावाही ठाकूर यांनी घेतला. कार्यक्रमाची सांगता प्रश्नोत्तराच्या सत्राने झाली. ‘सीडीएसएल’चे वरिष्ठ अधिकारी अजित मंजुरे यांनी याचे सूत्रसंचालन केले. ‘लोकसत्ता’तर्फे अजय वाळिंबे यांनी उपस्थितांचे आभार मानले.