जिल्ह्यासह राज्यातील कोणत्याही महामार्गाचे विस्तारीकरण वा तत्सम काम हे कोणा एकाचे न राहता शासनाचे म्हणून पुढे येत असते, परंतु जर कोणाच्या ‘दूरदृष्टी व नियोजन’ला या कामांचे श्रेय देण्याचा प्रयत्न जाहीररीत्या फलकांद्वारे होत असेल तर त्यामागील हेतू निश्चितच वेगळा समजावा लागेल. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर नाशिक ते त्र्यंबकेश्वर या ३० किलोमीटर महामार्गाच्या चौपदरीकरणात ठिकठिकाणी असे फलक उभारण्यात आले असून ‘मा. ना. छगन भुजबळ मंत्री, सा. बां. व पर्यटन यांचे दूरदृष्टी व नियोजनातून व मा. समीर भुजबळ, खासदार यांच्या प्रयत्नातून’ असा उल्लेख या फलकांवर आहे. फलकांचे एकंदर स्वरूप पाहून ते राज्य शासनाच्या निधीतून होत आहे की, दस्तुरखुद्द भुजबळ यांच्या, असा प्रश्न मार्गस्थ होणाऱ्यांना पडत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र या फलकांवरील मजकुराविषयी मौन बाळगणे पसंत केले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, नाशिक-त्र्यंबकेश्वर या ३० किलोमीटरच्या चौपदरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. शक्य तितक्या लवकर हे काम पूर्णत्वास नेण्याचा या विभागाचा प्रयत्न असून पुढील चार महिन्यांत विस्तारित मार्ग वाहनधारकांसाठी खुला केला जाणार आहे. राज्यात कोणत्याही महामार्गाचे विस्तारीकरण, नूतनीकरण वा नव्या रस्त्याचे काम सुरू करताना ठेकेदाराकरवी हा विभाग त्या कामाचे स्वरूप, कधी सुरू झाले, काम कधी पूर्ण होणार, त्यावर होणारा खर्च आदी माहिती फलकावर दिली जाते.
तथापि, नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर या फलकाऐवजी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या अफाट दूरदृष्टी आणि नियोजनाची चुणूक दाखविली गेल्याने वाहनधारक बुचकळ्यात पडले आहेत. या मार्गालगत अनेक ठिकाणी असे भव्य फलक उभारले गेले आहेत.
एखाद्या कामाचे श्रेय एखाद्यालाच देण्याचा प्रकार या फलकांमुळे सुरू झाल्याची वाहनधारकांची भावना आहे. मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ तत्त्वावर देण्याचा प्रयत्न केला होता. जागरूक नागरिकांनी त्यास प्रखर विरोध करून तो डाव हाणून पाडला. कारण या पद्धतीने महामार्गाचे विस्तारीकरण झाल्यास त्र्यंबक व नाशिककरांना त्याचा नाहक आर्थिक फटका सहन करावा लागणार असल्याचा आक्षेप घेतला गेला. त्यास बराच विरोध झाल्यावर अखेर या विभागाचा नाइलाज झाला आणि हे काम शासनाच्या निधीतून करण्याचे निश्चित झाले. नागरिकांकडून करापोटी दिली जाणारी रक्कम शासन विकास कामांसाठी खर्च करते. त्याच निधीतून हे काम होत असताना आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून रस्त्याची कामे करणे ही आपोआपच छगन भुजबळ यांची जबाबदारी ठरते. मग अशा फलकांद्वारे त्यांना श्रेय देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.
या कामावर जनतेचा करापोटी जमा झालेला पैसा खर्च होत असताना खुद्द मंत्र्यांच्या नावे असा फलक उभारला जाणे हे अयोग्य असल्याचे मत नितीन परांजपे यांनी व्यक्त केले आहे. आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हा जाहिरातबाजीचा प्रकार असू शकतो. वास्तविक या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाला पारदर्शकता बाळगायची होती तर या कामाचे संपूर्ण विवरण फलकांवर देणे अभिप्रेत होते. त्याद्वारे काम कधी सुरू झाले, कधी पूर्ण होणार, याची कोणतीही माहिती नागरिकांना मिळाली असती. परंतु तसे काहीही या विभागाने केले नसल्याचा आक्षेपही त्यांनी नोंदविला.  
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या फलकांविषयी काहीही बोलण्यास नकार दिला. हे फलक बांधकाम विभागाने उभारले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.