‘फिरसे जी उठूंगा मै उन्हीं बनारस की गलियोंमे..फिर किसी झोया का प्यार ढुंढते हुए’, असे म्हणत ‘रांझना’तील धनुष जेव्हा पुन्हा एक दा बनारसच्या गल्ल्यांमधून फिरत असतो तेव्हा त्याच्यामागोमाग आपलीही नजर वाराणसीच्या गल्लया, गंगेचा घाट, अध्र्य देणारे पुजारी आणि त्यांच्या बरोबर मागे दिसणारे उगवता सुर्याचा लालकेशरी गोळा.. कुठेतरी आपण वाराणासीला जायला हवे अशी खूणगाठ मनाशी बांधली जाते. ‘यह जवानी है दिवानी’ चित्रपटात रणबीर आणि दीपिका ज्या इच्छापूर्तीच्या मंदिरात पोहोचण्यासाठी संपूर्ण बर्फाचा डोंगर पार करून जातात ते मंदिर तिथे खरेच आहे की नाही, ही उत्सूकता आपल्याही मनात चाळवली जाते. अशी अनेक ‘फिल्मी’ ठिकोणांची सफर कशी करायची, याची माहिती देणारा मार्गदर्शक आपल्याला उपलब्ध झाला आहे.
‘लोनली प्लॅनेट’ या टुरिझम क्षेत्रातील अग्रणी कंपनीने चित्रपट आणि पर्यटन या दोन गोष्टींचा दुवा साधत त्यांना सामाज्ञांच्या कक्षात आणण्यासाठी ‘फिल्मी एस्केप’ नावाचे मार्गदर्शक पुस्तक बाजारात आणले आहे. ‘मुंबईत येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला जुहू परिसराला भेट द्यायची असते कारण तिथेच म्हणे बॉलिवूडचा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह सगळ्या कलाकारांचे ओळीने बंगले आहेत. ‘शोले’चे रामगढ, ‘काश्मीर की कली’मधले काश्मीर आपणही चित्रपटात दिसते तसे अनुभवावे ही अनेकांची इच्छा असते. कारण, लोकांना विविध शहरांची, संस्कृतीची ओळख होण्यासाठी चित्रपट हे आजचे प्रभावी माध्यम ठरले आहे. आणि म्हणूनच त्या त्या चित्रपटातील विशिष्ट ठिकाण, तेथील अन्य आकर्षणे, त्या कलाकारांच्या तिथल्या आठवणी आणि तिथे राहण्याच्या-खाण्याच्या सोई अशी माहिती देणाऱ्या पुस्तकाची निर्मिती आम्ही केली’, अशी माहिती ‘लोनली प्लॅनेट’चे भारतातील अधिकारी शेष शेषाद्री यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना दिली.
‘फिल्मी एस्केप’मु़ळे चित्रपट आणि पर्यटन असा दुवा फार अभिनव पध्दतीने साधला गेला आहे, अशी प्रतिक्रिया इम्तियाज अली, महेश भट्ट यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी दिली. चित्रपटासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे लोकेशन त्यामुळे प्रॉडक्शन कंपन्या आणि कलाकारांनीसुध्दा ही संकल्पना उचलून धरली असल्याचे शेषाद्री यांनी सांगितले. मात्र, ही ‘फिल्म टुरिझम’ची सुरू वात आहे, असे मात्र त्यांना वाटत नाही. फिल्म टुरिझमच्या दिशेने विचार नक्कीच सुरू आहे पण, त्यासाठी केवळ बॉलिवूड नव्हे तर दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीसह अन्य प्रादेशिक चित्रपटांवरही भर द्यायला हवा, असे मत शेषाद्री यांनी व्यक्त केली.