बोफोर्स आणि तब्बल १० हजार फूट उंचीवरून मारलेली उडी!
खरे तर एखाद्या शहरामध्ये लष्करी वेशातील सैनिकांची वर्दळ वाढली की, तिथले गांभीर्यही वाढते. लष्कर आपल्या दारी येणे हे फारसे चांगले मानले जात नाही. पण येत्या १५ व १६ डिसेंबर रोजी भारतीय लष्कर म्हणजेच त्यातील तब्बल दीड हजार जवान त्यांच्या अत्याधुनिक शस्त्रसाठय़ासह मुंबईत मध्यवर्ती असलेल्या शिवाजी पार्क मैदानात मुंबईकरांच्या भेटीसाठी सज्ज असणार आहेत. १९७१ साली पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धातील विजय दिवसाची स्मृती या निमित्ताने जागविल्या जाणार असून भारतीय लष्कराने मुंबईकरांना ही आगळी भेटच दिली आहे.
एरवी लष्कर आणि सामान्य माणूस यांचा तसा फारसा संबंध येत नाही. लष्करातील अनेक बाबींबद्दल मात्र या सामान्यांच्या मनात सतत कुतूहल असते. त्यात जवानांच्या कार्यशैलीबरोबरच सर्वाधिक कुतूहल असते ते रणगाडे, रडार यंत्रणा याबद्दल. लहान मुलांमध्ये याचे सर्वाधिक आकर्षण असते आणि त्यांच्याकडे असलेल्या खेळण्यांमधून ते दिसते. दोन दिवस होणाऱ्या या लष्करी मेळ्यामध्ये भारतीय लष्करातर्फे वापरले जाणारे प्रमुख चार प्रकारचे रणगाडे पाहायला मिळणार आहेत. त्यात भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या बोफोर्स तोफेचाही समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे कारगिलच्या युद्धात हीच बोफोर्स तोफ आपल्या कामी आली होती. याशिवाय सध्या जगातील सर्वात अद्ययावत समजला जाणारा टी९० रणगाडाही इथे पाहायला मिळणार आहे. त्याशिवाय टी७२ आणि टी५५ या रणगाडय़ांचेही दर्शन होईल. गेल्या खेपेस सुमारे ९ वर्षांपूर्वी झालेल्या लष्करी मेळ्यात मुलांना रणगाडय़ांवर सैरही करायला मिळाली होती. यंदा तशी शक्यता नाही, असेही सांगण्यात आले.
या दोन्ही दिवशी सकाळी ११ ते दुपारी २ असा तीन तासांचा निश्चित स्वरूपाचा कार्यक्रम आखण्यात आला असून तो सामान्यांना बाजूला बसून पाहता येईल. त्यात सुरुवातीस राष्ट्रगीताने सुरुवात होईल, त्यानंतर लष्करी सेवेतील ध्रुव हेलिकॉप्टर्स शिवाजी पार्कवरून सलामी देत पुढे जातील. लष्कराच्या घोडदळातर्फे आणि त्यांच्या मोटारसायकल दलातर्फे खास कसरतीही सादर करण्यात येतील. याशिवाय राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्रसैनिकही कवायती सादर करणार असून अस्सल महाराष्ट्राच्या असलेल्या लेझीम आणि मल्लखांबांच्या कसरतींचा समावेशही यामध्ये असणार आहे. या कार्यक्रमातील सर्वात रोमांचक क्षण असणार आहे तो, तब्बल १० हजार फूट उंचीवरून पॅराट्रपर्सनी शिवाजी पार्कवर मारलेली उडी. हा श्वास रोखायला लावणारा क्षण असेल. त्यासाठी भारतीय सैन्य दलातील निष्णात पॅराट्रपर्स खास जबलपूरहून मुंबईमध्ये येऊन दाखल झाले आहेत.  त्यानंतर दुपारी २ वाजल्यापासून ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत हे लष्करी प्रदर्शन सर्वासाठी खुले असेल.     

शिवसैनिकांचे स्वागत असेल, झेंडे खाली ठेवून यावे
गेले काही दिवस शिवाजी पार्क वादाच्या भोवऱ्यात आहे. याच शिवाजी पार्कवर लष्कराचा हा सोहळा होत असून बाजूलाच असलेला शिवसेनाप्रमुखांवर अंत्यसंस्कार केलेला चौथरा शिवसैनिकांनी चारही बाजूंनी घेरलेला आहे. त्याबाबत विचारता लष्कराच्या महाराष्ट्र आणि गुजरात विभागाचे प्रमुख मेजर जनरल राजेश बावा म्हणाले की, ते भेटायला आले होते तेव्हा आम्ही त्यांना सांगितले की, आम्ही सहा महिन्यांपूर्वीपासून हा कार्यक्रम आखला असून त्यासाठी सर्व परवानग्या घेतल्या आहेत. उच्च न्यायालयानेही परवानगी दिली आहे. तुमच्या वादाशी आमच्या कार्यक्रमाचा कोणताही संबंध नाही. शिवसैनिक आले तर त्यांचे स्वागतच असेल, त्यांनी झेंडे खाली ठेवून यावे. शिवाय कार्यक्रमाच्या काळातही आजूबाजूला असलेले सर्व झेंडे काढण्यात येतील, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सध्या एकूणच लष्कराकडे येण्याचा तरुणांचा ओढा कमी झाला असून अशा मेळ्यांमधून ती मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगून ते म्हणाले की, समाजाने ही मानसिकता बदलणे खूप गरजेचे आहे. कारण हे केवळ एक वेगळे करिअर नाही तर देशसेवाही आहे. देशाच्या संरक्षणाशी त्याचा थेट संबंध आहे. त्यामुळे तरुणांनी अधिकाधिक संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.