कापूस व्यापाऱ्याची बॅग पळविल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा शहराच्या कोमटीगल्लीत सराफा व्यापाऱ्यांच्या दुचाकीच्या डिकीतून रोख दीड लाख रुपये, तसेच ३० तोळे सोने असा एकूण साडेदहा लाखांचा ऐवज पळविण्यात आला. सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
शहरात व्यापाऱ्यांच्या बॅगा पळविण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. मागील वर्षी व्यापारी ओमप्रकाश डागा यांची २६ लाखांची बॅग हैदराबाद बँकेच्या मुख्य शाखेसमोरून दिवसाढवळ्या पळविली होती. त्या घटनेचा अजूनही तपास लागू शकलेला नाही. कृषी विद्यापीठातील सायळा रस्त्यावर ४ दिवसांपूर्वी राजस्थानातील कापूस व्यापारी सतीश शर्मा यांचे मुनीम अलोक शर्मा व गाडीचालक कमलेश गुप्ता या दोघांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील १९ लाखांची बॅग दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पळवून नेली. या घटनेचे पोलिसांना अजूनही धागेदोरे मिळाले नाहीत. तोच सोमवारी पुन्हा लूट झाली. सकाळी कोमटी गल्लीतून अग्रवाल ज्वेलर्ससमोरून सव्वादहा लाखांचा ऐवज लांबविण्यात आला.
कोमटीगल्लीत राजेश ध्रुवप्रसाद अग्रवाल यांचे अग्रवाल ज्वेलर्स हे दुकान आहे. अग्रवाल आपल्या दुचाकीवरून (एमएच २२ के २२६६) सकाळी दुकान उघडण्यासाठी आले. त्यांनी गाडीच्या डिकीत रोख दीड लाख रुपये व ३० तोळे सोने ठेवले होते. गाडी बाजूला लावून दुकान उघडत असतानाच चोरटय़ाने गाडीची डिकी उघडून आतील दागिने व रोख रक्कम पळविली. दुकान उघडल्यानंतर बाहेर येऊन पाहताच डिकी उघडल्याचे व डिकीतील ऐवजही लंपास झाल्याचे अग्रवाल यांच्या लक्षात आले. त्यांनी नानलपेठ पोलिसांना कळविले. अवघ्या २-३ मिनिटांत हा प्रकार घडल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.