भिंगारमधील गणेश विसर्जन मिरवणुकीत बहुसंख्य तरुण मंडळांनी कर्णकर्कश सीडीला फाटा देत पारंपरिक ढोल-ताशांच्या पथकांना प्राधान्य देण्याचा सकारात्मक बदल घडवला. या बदलामुळे नागरिकांनीही मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली. मिरवणुकीत १४ मंडळे सहभागी झाली होती. मिरवणूक रात्री उशिरापर्यंत चालली. पोलीस बंदोबस्त चोख होता.
परंपरेनुसार भिंगारमधील सार्वजनिक गणेश मंडळांच्या उत्सवमूर्तींचे आठव्या दिवशी विसर्जन केले जाते. सकाळी मानाच्या देशमुख वाडय़ातील गणपतीची जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे व छावणी मंडळाचे सीईओ विलास पवार यांच्या हस्ते उत्थापनाची पूजा करण्यात आली. बाराच्या सुमारास मिरवणुकीस सुरुवात झाली. ज्येष्ठ नागरिक संघ व स्वामी विवेकानंद जनकल्याणच्या वतीने मिरवणुकीत सीडीऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर मंडळांच्या कार्यकर्त्यांनी करावा यासाठी प्रबोधन केले जात होते, त्यास मंडळांनी प्रतिसाद दिला.
मानाचा देशमुख गणपती फुलांनी सजवलेल्या पालखीत, पुढे सनई-चौघडा ठेवून सहभागी होता, चौकाचौकांत नागरिकांनी त्याची पूजा केली. मैत्री प्रतिष्ठानच्या मंडळापुढील‘आवर्तन ग्रुप’चे ढोलताशांचे पथक आकर्षण ठरले. साईबाबा प्रतिष्ठानपुढील ढोल पथक, तलवारबाजी व दांडपट्टा पथकाने वाहवा मिळवली. आझाद मंडळाचे (लोहार गल्ली) ढोलताशांचे पथक १०० जणांचे होते. खळेश्वर मंडळाने गोफ विणण्याचा डाव सादर केला. सावता मंडळ, अंबिका मंडळ, शुक्लेश्वर मंडळ यांनीही कार्यकर्त्यांचे ढोलताशांचे पथक तयार केले होते. याशिवाय नेहरू चौक, शिवबा ग्रुप, काळभैरव मंडळ सहभागी होते.
ब्राह्मण गल्लीतून सुरू झालेली मिरवणूक मोमीन गल्ली-गवळी वाडा-सदर बाजार-भिंगार बँक चौक- दाणेगल्ली-मोमीन गल्ली-लोणार गल्ली-माळगल्ली-सरपण गल्ली पुन्हा ब्राह्मणगल्ली मार्गे शुक्लेश्वर मंदिराजवळ जाऊन तेथील विहिरीत विसर्जन केले जात होते. रात्री आठपर्यंत केवळ तीन गणपतींचे विसर्जन झाले होते.