आज व्यापाऱ्यांचा महामोर्चा
राज्य शासनाने राज्यातील विविध महापालिकांवर लादलेल्या एलबीटी कराच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या ‘व्यापार बंद’ला चौथ्या दिवशी उपराजधानीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्यबाजारपेठ सोडून चिल्लर विक्रेत्यांची दुकाने सुरू होती. शहरात येणारी आयात बंद करण्यात आल्याने ठोक व्यापारांकडून चिल्लर विक्रेत्यांना माल मिळेनासा झाल्यामुळे त्यांच्यासमोर दुकाने बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. एलबीटीला विरोधाला असंघटित व्यापाऱ्यांचा  पाठिंबा मिळत असून कामठी मार्गावर महाआरती करण्यात आली तर सदरमधील व्यापारांनी मोर्चा काढून निदर्शने केली.
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स आणि एलबीटी विरोधी संघर्ष समितीने पुकारलेल्या बंदला गेल्या चार दिवसात संमिश्र प्रतिसाद मिळत असल्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागात मिरवणुका आणि निदेर्शने करून एलबीटीचा विरोध केला जात आहे. सदर आणि बैरामजी टाऊन भागातील व्यापाऱ्यांनी संघटित मिरवणूक काढून व्यापारांना दुकाने बंद करायला लावली.
इतवारी, गांधीबाग, सीताबर्डी, सक्करदरा, महाल भागातील बाजारपेठा बंद होत्या. बुधवारी होलसेल मार्केट परिसरात किरकोळ आणि ठोक व्यापारांमध्ये झालेल्या वादामुळे प्रकरण तहसील पोलीस ठाण्यापर्यंत गेले असताना दोन्ही संघटनेमध्ये समन्वय असावा या दृष्टीने चेंबरच्या कार्यालयात प्रफुलभाई दोशी आणि रमेश मंत्री यांच्या उपस्थित चिल्लर व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
राज्य सरकारने एलबीटीचा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी भंडारा मार्गावरील हनुमान मंदिरात व्यापारांनी महाआरती करून सरकारचा निषेध केला. मोमीनपुरा भागातही व्यापारांनी निदर्शने करून सरकारला इशारा दिला. या बंदला नागपूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने पाठिंबा देत उद्या गुरुवारी औषध बाजार पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.  इतवारी, गांधीबाग, कपडा मार्केट, सराफा ओळ, महाल, केळीबाग, गोकुळेपेठ, सीताबर्डी, मस्कासाथ,लकडगंज, वर्धमाननगर, सदर, बैरामजी टाऊन, प्रतापनगर, कॉटेनमार्केट, पाचपावली, इंदोरा, सक्करदरा, नंदनवन, मानेवाडा या भागातील दुकाने कमी अधिक प्रमाणात बंद होते.
व्यापार बंद संदर्भात बोलताना रमेश मंत्री यांनी सांगितले, जो पर्यंत फेडरेशनकडून बंद मागे घेण्याचा निर्णय होत नाही तो पर्यंत संप सुरू राहणार आहे. सरकार एलबीटीच्या संदर्भात व्यापारांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेत नाही त्यामुळे उद्या, शुक्रवारी शहीद चौकातून महामोर्चा काढण्यात येणार असून त्यात शहरातील व्यापारी सहभागी होणार असल्याचे मंत्री सांगितले.
नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स आणि एलबीटी विरोधी संघर्ष समितीने पुकारलेल्या व्यापार बंदचा फटका सामान्य ग्राहकांना बसत असून केव्हा एकदा हा संप संपतो याची लोक आस लावून बसले आहे. मे आणि जून महिन्यात मोठय़ा प्रमाणात विवाह मुहूर्त असल्यामुळे अनेक लोक किराणा, कपडा आणि सोने-चांदीच्या खरेदीसाठी शहरातील मुख्य बाजारपेठमध्ये गेल्यावर त्यांना दुकाने बंद दिसतात. ठोक विक्रेत्यांची दुकाने केव्हा उघडतील ते सांगता येत नाही. चिल्लर विक्रेते अर्धे शटर ठेवून विविध दैनंदिन वस्तूची खरेदी करीत आहे मात्र त्यांच्याकडील माल संपायला आला आहे. ठोक व्यापारांनी शहरातील चिल्लर विक्रेत्यांना माल देणे बंद केले आहे. बाहेरून आलेला माल ठोक व्यापारी उचलत नाही त्यामुळे शहराच्या बाहेर मोठय़ा प्रमाणात ट्रकमध्ये आणि गोदामात माल पडून आहे. या सर्वांचा फटका सामान्य नागरिकांना पडत असून राज्य सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. इतवारीतील किराणा ओळीतील काही दुकानांमध्ये ठरलेले ग्राहक असून त्यांना किराणा मिळणे कठीण झाले आहे. या बंदमध्ये सोना-चांदी व्यापारी संघटना सहभागी झाल्यामुळे लग्नसराईच्या दिवसात त्यांची मोठय़ा प्रमाणात उलाढाल ठप्प झाली आहे. दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसल्यामुळे ते चिंतेत असल्याचे दिसून आहे. कॉटेन मार्केट परिसरातील शेतीसाठी लागणाऱ्या बी बियाण्यासह इतर साहित्याची दुकाने बंद असाल्यामुळे त्याचा फटका  शेतकऱ्यांना पडतो आहे.