परभणीसह जिल्ह्य़ातील पाथरी, सेलू व जिंतूर तालुक्यांत शुक्रवारी रात्री बेमोसमी पाऊस व वादळ-वाऱ्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. आठवडय़ात दुसऱ्यांदा अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्य़ातील शेतकरी पाणीटंचाईच्या झळा सोसत आहेत. त्यात आता वादळी वाऱ्यासह झालेल्या नुकसानीचे संकट कोसळले.
शुक्रवारी रात्री आठनंतर दैठणा परिसरातील साळापुरी, पोखर्णी, इंदेवाडी आदी गावांत अर्धा तास जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे शेतात उभे असलेले ज्वारी, गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले. सध्या ज्वारी काढणी चालू आहे. काही ठिकाणी ज्वारी काढून शेतामध्ये आडवी पडली. ही ज्वारी काळी पडण्याची भीती व्यक्त होत आहे. रात्री नऊच्या सुमारास पाथरी तालुक्यातील गुंज, उमरा, गोडगाव, अंधापुरी, लोणी, बाभळगाव परिसरात पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे पिके जमीनदोस्त झाली, तर काही झाडे उन्मळून पडली. पालम तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. सेलू तालुक्यातील देऊळगाव गात, म्हाळसापूर, रवळगाव, मोरेगाव, शिराळा, खुपसा, वाघ पिंप्री, गुगळी धामणगाव आदी ठिकाणी गारा पडल्या. बोरी परिसरातही बेमोसमी पावसाने रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले. गेल्या आठवडय़ातही बेमोसमी पाऊस, वादळवाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाले. मात्र, प्रशासनाकडून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले नाहीत. गेल्या आठवडय़ात व शुक्रवारी झालेल्या पाऊस व वाऱ्यामुळे नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून तातडीने सुरू करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. बोरी व ताडकळस शनिवारी दुपारी पाऊस झाला. परभणीतही शिडकावा झाला.
हिंगोलीत पाचव्यांदा पाऊस
वार्ताहर, हिंगोली – हिंगोली जिल्ह्य़ात जानेवारीमध्ये दोन वेळा, त्यानंतर १५ फेब्रुवारी, २२ फेब्रुवारी रात्री व शनिवारीही सायंकाळी चार-पाचच्या दरम्यान वादळीवाऱ्यासह पाचव्यांदा गारांचा पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्य़ात जानेवारीमध्ये दोन वेळा झालेल्या गारांच्या पावसामुळे सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान झाले.
नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असताना १५ फेब्रुवारीला जिल्ह्य़ात तिसऱ्यांदा वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. यात ३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.
पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्णत्वाला जाते न जाते तोच शुक्रवारी रात्री वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. शुक्रवारच्या पावसाची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली न घेतली तोच शनिवारी संध्याकाळी पुन्हा वादळीवाऱ्यांसह जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.