जालन्यात दुष्काळाचा फटका
पीकपाण्याने समृद्ध गावाची दुष्काळाने रया गेली, याचे भीषण वास्तव सध्या खडका गावात पाहावयास मिळत आहे. जालना जिल्ह्य़ात दुष्काळाने एकूणच सगळेच चित्र धूसर झालेली अशी कितीतरी गावे आहेत. घनसांगवी तालुक्यातील खडका या दोन हजार लोकवस्तीच्या गावात दिसणारे हे चित्र दुष्काळाने ग्रासलेल्या गावांचे प्रातिनिधिक उदाहरण ठरावे.
खडका गाव पूर्वीपासून बागायती शेतीसाठी ओळखले जाते. जायकवाडीच्या लाभक्षेत्रात असणारे. गावच्या शिवारात विहिरी, विंधनविहिरींची संख्या बऱ्यापैकी आहे. या गावाला तालुक्यातील अन्य गावांप्रमाणे तीव्र दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. राज्यात सर्वात कमी पाऊस जालना जिल्हय़ात झाला आणि जिल्हय़ात सर्वात कमी पावसाची नोंद घनसावंगी तालुक्यात झाली. खडका येथील तरुण शेतकरी जयमंगल जाधव पावसाअभावी तालुक्यात उद्भवलेल्या भीषण स्थितीची माहिती देत होते. खडका गावाच्या शिवारात ४०० एकरांपेक्षा अधिक क्षेत्रात ऊस होता. पैकी २५ टक्के ऊस पाण्याअभावी पूर्ण जळाला, तर २५ टक्के मोठय़ा प्रमाणात नष्ट झाला. कापसाचे नि चाऱ्याचे पीकही हाती आले नाही. ज्वारीची अपेक्षा होती. परंतु ज्वारीचे जे पीक आले त्याच्या कणसात दाणे भरण्याचे प्रमाण कमी राहिले. जे थोडे पीक उभे राहिले, त्यात रानडुकरांचा मोठा उपद्रव आहे. परिसरातील ८०-९० विहिरींनी तळ गाठला. विंधन विहिरींचे पाणी खोल गेले. शेतकरी जनावरांची विक्री करीत असले तरी त्यांची खरेदी करणारेही कमीच आहेत. जाधव यांच्या कुटुंबाची ३२ एकर शेती. पैकी १५ एकरांत कापसाचे पीक घेतले. अल्प पावसामुळे १५ एकरांत अवघे २०-२२ क्विंटल कापूस उत्पादन झाले. आठ एकरांत तुरीचे पीक घेतले. परंतु हाती काही लागले नाही. बेण्यासाठी दोन एकरांत ऊस घेतला. परंतु त्यालाही पाणीटंचाईचा फटका बसला. खडका गाव जायकवाडीच्या लाभक्षेत्रात आहे. परंतु चौरीस ६-७ महिन्यांपूर्वी एकदा पाणी आले होते. त्यानंतर पाणी आले नाही. जनावरांसाठी चाऱ्याचे पीक घेतले. परंतु तेही हाती आले नाही. राजकीय पक्षाचा जिल्हा पातळीवरील पदाधिकारी म्हणून घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांना जयमंगल जाधव यांनी भेट दिली. ते म्हणाले, की ढाकेफळ, माहेरजवळा, गुरुपिंप्री, यावलपिंप्री, पारडगाव, अंतरवाला, सोलगव्हाण, चित्रवडगाव, राजेगाव आदी गावांत  भीषण स्थिती आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र आहे. घनसावंगी जिल्हय़ातील मोसंबीच्या सर्वाधिक बागा असणारा तालुका आहे. परंतु विहिरींना पाणी नसल्याने बागा उद्ध्वस्त होताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मोसंबी उत्पादकांची हानी भरून निघण्यासारखी नाही.