विभागातील पाच जिल्ह्य़ात निरनिराळ्या सहकारी संस्थांची संख्या ३१ हजार ६५० पर्यंत गेली असून जळगाव जिल्ह्यात तोटय़ातील संस्थांची संख्या सर्वाधिक आहे. कायद्याची भीती आणि सहकारातील आदर्शाची नीती संपुष्टात आल्याने हजारो ठेवीदारांच्या कोटय़वधीच्या ठेवी तोटय़ातील संस्थांमध्ये अडकल्या आहेत, अशी माहिती भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते पां. भा. करंजकर यांनी दिली आहे.
करंजकर यांनी माहिती अधिकारान्वये विभागातील सहकारी संस्थांची काय स्थिती आहे, याविषयीची माहिती मागितली. त्यानुसार प्राप्त झालेल्या आकडेवारीत पाच जिल्ह्य़ातील सहकारी संस्थांची संख्या पुढीलप्रमाणे- नाशिक ११ हजार ५६७, धुळे ३१८९, नंदुरबार १६९४, जळगाव पाच हजार ६७२, अहमदनगर नऊ हजार ५२८ आहे. सहकारी संस्थांमधील कारभार स्वार्थी संचालकांमुळे लयास जात असल्याचे सर्वत्र पाहावयास मिळते. केवळ सहकारी संस्थांची संख्या भरमसाठ असून चालत नाही तर, त्या संस्थांचा कारभार योग्य पध्दतीने होणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नसल्याने अवसायानातील नागरी सहकारी बँकांची संख्याही बरीच आहे. त्यात नाशिकमध्ये ४५ पैकी चार, धुळे सात पैकी चार, नंदुरबार सहा पैकी एक, जळगाव १३ पैकी १०, नगर २० पैकी ती, याप्रमाणे एकूण २२ नागरी सहकारी बँका अवसायानात निघाल्या आहेत.
ग्रामीण व शहरी तोटय़ातील जिल्हानिहाय पतसंस्थांच्या संख्येचा विचार करता जळगाव १७८, नाशिक ३५, धुळे आठ, नगर २८, नंदुरबार दोन तसेच विविध कार्यकारी सोसायटय़ांची तोटय़ातील संख्या पुढीलप्रमाणे- नाशिक ६०, धुळे २२८, नंदुरबार २०९, जळगाव २४८, नगर ७२४. विशेष म्हणजे नंदुरबार-धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकही अवसायनात निघाली आहे.