मासिक १० हजार रूपये वेतनाच्या मागणीसाठी यंत्रमाग कामगारांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल्याने दोन दिवसात इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगातील सुमारे ५० कोटी रूपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. तर, मंगळवारी झालेल्या यंत्रमाग कामगारांच्या मेळाव्यात उद्या बुधवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यंत्रमागधारकांचा मेळावा गुरूवारी होणार आहे.    
शहराच्या आर्थिक व्यवहारावर बंदचा परिणाम जाणवू लागला आहे. यंत्रमागासाठी लागणारे सूत व कापड विक्री थंडावली आहे. सायझिंग सुध्दा बंद पडले आहेत. प्रोसेसचे व्यवहार मंदावलेले आहेत. दररोज सुमारे २५ कोटी रूपयांची उलाढाल होत असते. ती आता ठप्प झाली आहे.     
थोरात चौकात झालेल्या यंत्रमाग कामगार कृती समितीच्या मेळाव्यात आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. कॉ.दत्ता माने यांनी बुधवारी प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला. अन्य कामगार नेत्यांची भाषणे झाली.     
शहरातील चार यंत्रमागधारकांच्यावतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात गुरूवारी मंगलधाम येथे यंत्रमागधारकांचा मेळावा होणार असल्याचे म्हटले आहे. कामगारांच्या बंदचा घडामोडींचा आढावा घेऊन व यंत्रमागधारकांची मते आजमावून पुढील निर्णय मेळाव्यात घेतला जाणार आहे.