राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची साफसफाई सुरू केल्यानंतर बबनराव पाचपुते यांचे मंत्रिपद गेले आणि ते मधुकर पिचड यांना मिळाले. नगरच्या राजकारणाची काही समीकरणे त्यामुळे बदलणार असून, मॅच फिक्सिंगला लगाम बसून काँग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याऐवजी पिचड यांचा प्रभाव अधिक वाढणार आहे.
सन १९७२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर पिचड यांच्या राजकीय वाटचालीत अनेक चढउतार आले. १९७२ ते १९८० पंचायत समितीचे सभापती, १९८० ला आमदार झाल्यानंतर अकोले मतदारसंघावर त्यांचा कायमच प्रभाव राहिला आहे. काँग्रेसला मानणारा आदिवासी हा मतदार असला तरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घडय़ाळ या भागात रुजविले. जून १९८५ मध्ये त्यांना राज्यमंत्रिपदाची पहिल्यांदा संधी मिळाली. मार्च १९८६ पर्यंत ते मंत्री होते. जून १९८८ ते मार्च १९९०, मार्च १९९३ ते सप्टेंबर १९९४ या काळात ते राज्यमंत्री होते. सप्टेंबर १९९४ ते नोव्हेंबर १९९४ या कालावधीत त्यांना कॅबिनेटमंत्री म्हणून बढती मिळाली. गोवारी समाजाच्या मोर्चात चेंगराचेंगरी होऊन ११४ लोकांचे बळी गेल्याने त्यांना नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा द्यावा लागला. मार्च १९९५ ते १९९९ या काळात ते विरोधी पक्षनेते झाले. ऑगस्ट १९९९ ते २००४ पर्यंत ते आदिवासी विकासमंत्री होते. डिसेंबर २००९ पासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. प्रदेशाध्यक्ष पदापेक्षा मंत्री होण्यातच त्यांना रस होता. आता ही संधी मिळाली.
पिचड यांच्यामुळे जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकली नाही. त्यात शंकरराव कोल्हे, प्रसाद तनपुरे, भानुदास मुरकुटे आदी राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांचा समावेश होता. आदिवासी असल्याने पक्षाने नेहमीच त्यांना आग्रक्रम दिला. पाचपुते यांनी काँग्रेसच्या मूळ प्रवाहाऐवजी दुस-या पक्षातून येऊन मंत्रिपद पटकाविले. नगरच्या राजकारणात पिचड हे वरिष्ठ नेते आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही त्यांचे चांगले जमते. काका-पुतण्याशी जमणारे ते राज्यातील मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत. स्थानिक राजकारणात त्यांचे सध्या विखे व थोरात या दोघा काँग्रेस मंत्र्याबरोबर मॅच फिक्सिंग होते. आता ते तोडावे लागेल. राजकारणात मुरकुटे, कोल्हे, तनपुरे, आमदार शंकरराव गडाख, चंद्रशेखर घुले तसेच अन्य नेत्यांशी व कार्यकर्त्यांशी त्यांचे जमते. माजी खासदार गोविंदराव आदिक यांच्याशीही त्यांची जवळीक आहे. सहमतीच्या राजकारणात ते आघाडीवर असतात. पण विखे व थोरात यांना पाचपुते शह देऊ शकले नव्हते. ते काम पिचड यांच्यावर आले आहे.
पिचड हे वादग्रस्त नसले तरी गोवारींच्या ११४ बळीमुळे विरोधी पक्षांनी त्यांना लक्ष्य केले होते. त्रंबकेश्वर परिसरातील जमीन खरेदी तसेच पप्पू कलानी व हितेंद्र ठाकूर यांच्याशी असलेले कथित संबंध, सीमा रिसोर्ट हॉलीडे प्रकरण यामुळे त्यांच्यावर काही काळ टीका होत होती. त्यातून ते सहीसलामत बाहेर पडले. आता मुलगा वैभव याला पुढे आणायचे असल्याने ते आगामी विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत. मंत्रिपदाची त्यांची राजकारणातील शेवटची इनिंग असली तरी नगरच्या राजकारणाला थोडेफार धक्के बसणार आहेत.