फेरीवाले, महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस यांच्या ‘अर्थ’पूर्ण युतीमुळे ‘हेरिटेज वास्तू’असा दर्जा प्राप्त झालेले छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक आणि परिसर फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडला आहे. या रेल्वेस्थानकातील भुयारी मार्ग आणि जीपीओकडील मार्गावर फेरीवाल्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला असून विशेष बाब म्हणजे समोर असलेल्या माता रमाबाई पोलीस ठाण्याच्या नाकावर टिच्चून फेरीवाल्यांचा व्यवसाय खुलेआम सुरू आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाच्या संपूर्ण परिसरालाच फेरीवाल्यांचा विळखा पडला असून काही वेळेस स्थानकाच्या बाहेर असलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमाच्या भाटिया बाग या बेस्ट बस स्थानकाच्या जागेतही फेरीवाले आपले सामान आणि वस्तू निर्धास्तपणे ठेवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्थानकातील फलाट क्रमांक एकवरून उतरल्यानंतर लाखो प्रवासी भुयारी मार्गातून बाहेर पडतात. या ठिकाणी पन्नासहून अधिक फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या दुकानांमुळे तेथे अगोदरच गर्दी असते. त्यात फेरीवाल्यांनी या दुकानांबाहेरील जागा अडवल्यामुळे प्रवासी आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच राहिलेली नाही. भुयारी मार्गात भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर चेंगराचेंगरीतही अनेक जण जखमी आणि मृत्युमुखी पडतील, अशी येथील परिस्थिती आहे. गंमत म्हणजे येथून अगदी हाकेच्या अंतरावर महापालिका मुख्यालय असून महापालिका आयुक्त, महापौर यांची कार्यालये येथे आहेत. सर्वसामान्य प्रवाशांना जे दिसते ते या मंडळींना दिसत नाही की त्यांनी डोळ्यावर मुद्दामहून कातडे पांघरले आहे, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
या स्थानकात कल्याण एण्डकडून बाहेर पडल्यानंतर बृहन्मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंतच्या पदपथावरही फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. स्थानकातील फलाट क्रमांक सातवरूनही अनेक प्रवासी बाहेर पडतात. काही प्रवासी जीपीओमार्गे पुढे जातात तर काही जण उजवीकडे वळून हुतात्मा चौकाच्या दिशेने वळतात.
येथेही बाहेर पडताना फेरीवाल्यांचे अडथळे पार करतच प्रवाशांना बाहेर पडावे लागते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वेस्थानक परिसराच्या शंभर मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास बंदी आहे. मात्र येथे सर्रास न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासलेला पाहायला मिळत आहे.