पावसाच्या ‘जलधारानृत्या’त रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी आपण खूप काही करीत आहोत, असा आभास पालिकेचे अधिकारी, स्थानिक अभियंते, कंत्राटदार आणि विशेषत: नगरसेवक करीत असले तरी हा प्रकार निव्वळ धूळफेक असून नागरिकांना मूर्ख बनविण्याचे धंदे आहेत. खड्डा पूर्ण कोरडा असल्याशिवाय आणि त्यातील धूळ हवेच्या ब्लोअरने बाहेर काढल्याशिवाय खडीमिश्रीत डांबर टाकले तर पहिल्या पावसात खडी आणि डांबर एकमेकांपासून काडीमोड घेतात आणि मग डांबर गटारात तर खड्डी रस्ताभर पसरते ही गोष्ट ‘डिप्लोमाहोल्डर’ अभियंत्याला देखील कळते. परंतु अभियंता असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षांपासून महापालिकेच्या अन्य रस्ते अभियंत्यांना कळत नाही, असे म्हणणे त्यांच्या ज्ञानाचा अपमानच होईल. याचाच अर्थ हे माहीत असूनही नागरिकांना मूर्ख बनवून त्यांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचाच हा धंदा आहे, हे स्पष्ट आहे. पावसाळ्यापूर्वीच ‘उत्तम’ रस्ते तयार करणे हा एकमेव इलाज मुंबईची शान राखू शकतो, हे सत्य सुमारे दोन दशके मुंबईवर सत्ता गाजविणाऱ्या शिवसेनेला नागरिकांनीच खडसावून सांगण्याची आता गरज आहे.
चांगले रस्ते न बांधल्यामुळे खड्डे बुजविण्याच्या दिखाऊ
कामावर मुंबईकरांचे तब्बल ४० कोटी रुपये दरवर्षी खड्डय़ांत जात आहेत.
पावसाळ्यापूर्वी पालिकेच्या कामगारांनी कोल्डमिक्सने (डांबरमिश्रीत खडी) खड्डे बुजविले. यथावकाश प्रशासनाने १४ कंत्राटदारांची नियुक्ती केली. पालिका कामगारांनी थातुरमातूर बुजविलेले खड्डे पावसाने जूनमध्ये हजेरी लावताच उखडले. त्यानंतर कंत्राटदारांनी खड्डे ‘बुजविण्याचा’ धडाका लावला. ४८ तासांमध्ये खड्डे बुजविण्याची सक्ती त्यांच्यावर करण्यात आली. अन्यथा त्यांच्यावर दंडाचा बडगा उगारण्यात आला. त्यामुळे खड्डय़ाचे छायाचित्र देताच तो ४८ तासांत बुजविण्याची
धडपड कंत्राटदार करतात. भर पावसात हे खड्डे बुजविले जातात.
खड्डे बुजविताना भर पावसात छत्री घेऊन उभे राहणाऱ्या नगरसेवकाबद्दल जनता चर्चा करते. असे ‘सर्वमंगल’ झाल्यानंतर थोडय़ाच वेळात पावसाच्या एका सरीत खड्डय़ांतील खडी रस्त्यावर पसरते. मात्र,
खड्डा बुजविल्याचे सांगितल्याने कंत्राटदाराला पैसे मिळतात, नगरसेवकाचा ‘काम करण्याचा शो’ जनता बघते आणि जनता स्वत:च खड्डय़ात जाते.
खड्डा उखडल्यानंतर  खडी रस्त्यावर पसरते. कंत्राटदार ती उचलत नाही तर सफाई कामगारही तिला हात लावत नाहीत. या खडीवरून घसरून मग दुचाकींचे अपघात होतात. २ जुलै रोजी मालाडमध्ये झालेल्या अशाच एका अपघातात एका तरुणाला प्राण गमवावे लागले.

पूर्वी रस्ता ओला असताना विटांचे तुकडे भरून खड्डा बुजविला जाई. परंतु नंतर रस्त्याचे काम करताना हे तुकडे काढणे जिकीरीचे होई. त्यामुळे ‘लाईन पावडर’, दगड आणि दगडांचा बारीक चुरा वापरून पावसाच्या रिपरिपीतही खड्डा बुजविला जाई. लाईन पावडरमुळे पाणी शोषले जायचे आणि मिश्रण अधिक घट्ट व्हायचे. त्यावर डांबरीकरण करणे अधिक सोपे जायचे. त्यामुळे रस्ते गुळगुळीतही होत आणि मुसळधार पावसातही टिकत असत, अशी माहिती माजी उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) डी. डी. नाईक यांनी दिली.

‘भूगोल’ का बदलता?
खड्डा भरताना कोल्डमिक्स खड्डय़ाबाहेर उंचवटा होईल, अशा तऱ्हेने भरले जातात. त्यामुळे आधीचे खड्डे भरले गेल्यानंतर या उंचवटय़ांमुळे बाजूचा सखल भाग खड्डा बनतो. पुन्हा त्याच प्रकाराची पुनरावृत्ती होते. वास्तविक खड्डा भरताना तेवढा चौरस उकरून काढणे आवश्यक असते. परंतु दर्जाशी आणि अभियांत्रिकीशी काहीही देणेघेणे नसलेले कंत्राटदार मन मानेल तसे खड्डे भरतात. मग आसपास पाणी साचून आणखीन खड्डे पडतात, अशी प्रतिक्रिया महापालिकेतील एका स्वेच्छानिवृत्ती रस्ते अभियंत्याने दिली.