ग्रंथ संग्रहालयाच्या इमारतीला भाडेकरू दुकानदारांचा विळखा
दादर पश्चिमेला असणाऱ्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या इमारतीला भाडेकरू दुकानदारांचा विळखा पडला असून ग्रंथ संग्रहालयाच्या मालकीच्या या इमारतीत भाडेकरू दुकानदार शिरजोर झाले आहेत. दुकानदारांच्या या अतिक्रमणामुळे ग्रंथ संग्रहालयाचे प्रवेशद्वार शोधणे म्हणजे एक दिव्य झाले आहे.
दादर पश्चिमेला रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर ही इमारत आहे. इमारतीची मालकी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाकडे असून ती ७०-८० वर्षे जुनी आहे. काही वर्षांपूर्वी महापालिकेने या इमारतीला धोकादायक म्हणून नोटीस पाठविल्यानंतर येथील ग्रंथालय बंद पडले. पण इमारतीमधील अन्य दुकाने मात्र सुरू होती. ‘लोकसत्ता’नेच या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर बंद पडलेले हे ग्रंथालय सुरू झाले होते. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तळमजल्यावरील जागा निवासी असताना तेथे दुकाने कशी काय सुरू केली, अशी विचारणा महापालिकेने एका नोटिशीद्वारे केली होती. मात्र आजही इमारतीच्या तळमजल्यावरील सर्व दुकाने सुरू आहेत. त्यापैकी काहींनी ग्रंथ संग्रहालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच कब्जा केला आहे. त्यामुळे ग्रंथ संग्रहालयाचे प्रवेशद्वार शोधून काढावे लागत आहे.
ग्रंथ संग्रहालयाच्या तळमजल्यावर ग्रंथ संग्रहालयाचा फलक ठळकपणे लावण्यात आला होता. मात्र आता हा फलक गायब झाला असून एका भाडेकरू दुकानदाराच्या पाटीवरच दुकानाचे आणि ग्रंथ संग्रहालयाचे नाव लिहिण्यात आले आहे. तळमजल्यावर प्रसाधनगृह असून तेथे फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. येथे फेरीवाल्यांचे सामान बेकायदा ठेवले जाते. तळमजल्यावरील प्रसाधन गृहाजवळ जाळी बसविण्यात आल्याने त्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे संग्रहालयात येणारे सभासद तसेच अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थीनीची खूप गैरसोय होते.
ग्रंथ संग्रहालयाची इमारत मोक्याच्या जागी असल्याने आणि खूप जुनी झाल्याने आता इमारतीच्या पुनर्विकासासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे काही ना काही अडचणी उभ्या करून किंवा भाडेकरू दुकानदारांच्या शिरजोरीकडे दुर्लक्ष करून ग्रंथ संग्रहालयाचे सभासद कमी करण्याचा आणि सभासद कमी झाले की ग्रंथ संग्रहालय बंद करण्यासाठी तर हा खटाटोप नाही ना, असा प्रश्न सभासदांना पडला आहे.
मराठी माणसांचे हक्क आणि त्यांचा कैवार घेणारे महापालिकेत सत्तेवर असतानाही त्यांचे दादरमधील लोकप्रतिनिधी तसेच मराठी माणसाच्या ‘नवनिर्माणा’साठी ओरडणाऱ्या मंडळींनीही भाडेकरू दुकानदारांच्या शिरजोरीकडे केलेल्या ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्षाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 8, 2013 2:07 am