शिधावाटप अधिकाऱ्यांनी साठेबाजीच्या विरोधात केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आठवडाभर धान्य बाजार बंद ठेवून पुन्हा नवीन धान्य खरेदी थांबविण्याचीही धमकी देणाऱ्या वाशीतील घाऊक व्यापाऱ्यांच्या आडमुठय़ा भूमिकेमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची भीती असली तरी मागील पंधरवडय़ाच्या तुलनेत प्रमुख डाळींचे घाऊक दर मात्र कमी झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. घाऊक बाजारात डाळी किलोमागे पाच ते सात रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. संतापजनक बाब म्हणजे ही स्वस्ताई अवतरत असतानाही किरकोळ विक्रेते मात्र संपाचे कारण सांगत स्थानिक दर वाढवू लागले आहेत. महागाईने होरपळणाऱ्या सामान्य जनतेला लुटणाऱ्या या किरकोळ व्यापाऱ्यांविरुद्ध सरकारने कारवाईचा बडगा तातडीने उगारण्याची गरज आहे.
घाऊक बाजारात उत्तम प्रतीची तूरडाळ, मूगडाळीचे दर किलोमागे ७० रुपयांच्या घरात असताना किरकोळ विक्रेते संपाचा बागुलबुवा दाखवत ९० ते ९५ रुपयांनी या डाळी विकू लागले आहेत. विशेष म्हणजे, पुरवठा कमी असूनही घाऊक बाजारात अजूनही गहू, तांदळाचे दर नियंत्रणात आहेत. असे असताना किरकोळ बाजारात ग्राहकांच्या लुटीचा बाजार मात्र तेजीत आहे.
शिधावाटप अधिकाऱ्यांनी आठवडय़ाभरापूर्वी साठेबाजीच्या विरोधात कारवाई केल्याने एपीएमसीच्या धान्य बाजारातील व्यापारी संपावर गेले होते. शनिवारी या व्यापाऱ्यांनी संप मागे घेतला असला तरी त्याचबरोबर नवीन धान्य खरेदी थांबविण्याचाही निर्णय घेतला. त्यामुळे बाजारात पुढील आठवडाभर पुरेल इतकाच धान्यसाठा शिल्लक आहे, अशी चर्चाही सध्या रंगली आहे. बाजारात असे प्रतिकूल वातावरण असताना आणि धान्याची आवक रोडावल्याचे सांगितले जात असले तरी धान्य, डाळींचे दर मात्र अजूनही आवाक्यात आहेत. गेल्या आठवडय़ापासून बंदमुळे राज्यांतर्गत तसेच अन्य राज्यांतून मुंबईत येणारा धान्याचा ओघ पूर्णपणे बंद झाला आहे. असे असले तरी दिवाळीत तसेच त्यानंतर आठवडाभर बाजारात चांगली आवक झाल्याने दर अजूनही आवाक्यात आहेत, अशी माहिती एपीएमसीचे उपसचिव प्रमोद जिरापुरे यांनी ‘वृत्तान्त’ला दिली. सोमवारी बाजार संपला तेव्हा उत्तम प्रतीची तूरडाळ किलोमागे ७० रुपयांवर होती. मूगडाळ ( ६५), उडीदडाळ (५७), हरभरा डाळ ((५८), मसूर डाळ (४४) आदींचे दर पंधरवडय़ाच्या तुलनेत स्वस्त झाल्याचे चित्र दिसून येत होते. पंधरवडय़ापूर्वी हेच दर अनुक्रमे ८० रु., ७० रु., ६५ रु., ६२ रु., ४८ रु. असे होते. त्यामुळे संपकाळ असूनही डाळींचे दर उतरल्याचे चित्र अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे. पंधरवडय़ापूर्वी डाळींची आवक चांगली झाली. त्याचा पुरेसा साठा अजूनही उपलब्ध आहे. तसेच संपकाळामुळे मुंबई तसेच ठाण्यात निर्यात होणाऱ्या मालाचे प्रमाण अत्यल्प असे होते. त्यामुळे डाळींचे भाव कमी झाले आहेत, असा दावा धान्य बाजाराचे संचालक जयेश व्होरा यांनी केला. त्याचबरोबर ज्वारी (२०), बाजरीचे (१८) दरही स्थिर असले तरी संपाचा बागुलबुवा उभा करत किरकोळ विक्रेत्यांनी डाळींच्या मोठी दरवाढ केली आहे.

तांदूळ, डाळींचा साठा पुरेसा!
नवी मुंबई / प्रतिनिधी
धान्याच्या घाऊक व्यापाऱ्यांनी आठवडाभरापासून पुकारलेल्या बंदमुळे वाशीच्या घाऊक बाजारात सोमवारी गव्हाचा साठा जवळपास संपुष्टात आला असला तरी मुंबईकरांना अजूनही आठवडाभर पुरेल इतका तांदूळ व डाळींचा साठा बाजारात आहे. मात्र, राज्य सरकारवर दबाव वाढविण्यासाठी धान्याचा अल्प साठा असल्याची ओरड व्यापाऱ्यांनी सुरू केल्याने बाजारात नेमका किती धान्यसाठा उपलब्ध आहे, याविषयी सोमवारी संभ्रमाचे वातावरण होते. नवीन धान्याची खरेदी लांबली तरी डाळींची फारशी कमतरता जाणवणार नाही इतका साठा आहे, अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव प्रमोद जिरापुरे यांनी दिली. मात्र, जेमतेम तीन दिवस पुरेल इतकाच डाळींचा साठा असल्याचा दावा धान्य बाजाराचे संचालक जयेश व्होरा यांनी केला.
दरम्यान, व्यापाऱ्यांनी सध्या ‘खरेदीबंद आंदोलन’ सुरू केले असले तरी ‘थेट पणन’च्या माध्यमातून मुंबईत थेट धान्याचा पुरवठा करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. असे असताना केवळ शासनावर दबाव वाढविण्यासाठी व्यापारी रडीचा डाव खेळत असल्याचे बोलले जात आहे.
आम्हाला संपाची हौस नाही..
शिधावाटप अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई अयोग्य होती. त्यामुळे व्यापाऱ्यांना बंद तसेच धान्य खरेदी थांबविण्याशिवाय पर्याय नाही. ‘अपुरा धान्यसाठा असल्या’ची आवई उठविलेली नसून प्रत्यक्ष परिस्थिती तशीच आहे, असा दावा व्होरा यांनी केला. संप करण्याची व्यापाऱ्यांना हौस नसते, असेही ते म्हणाले.
घाऊक व्यापाऱ्यांचा संप का?
ठाणे शिधावाटप कार्यालयाने आठवडाभरापूर्वी ठाणे बेलापूर औद्योगिक पट्टयातील गोदामांमध्ये धान्याचा बेकायदा साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कारवाई केली. या कारवाईत सुमारे २५ कोटी रुपयांचे धान्य जप्त करण्यात आले. बाजारात धान्य साठविण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने एमआयडीसीतील गोदामांमध्ये ठेवण्यात येते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने केलेली कारवाई अयोग्य असल्याचे मत व्यक्त करत धान्य व्यापाऱ्यांनी थेट बंदचे हत्यार उगारले. तसेच उच्च न्यायालयातही धाव घेतली. दुकानाव्यतिरीक्त इतरत्र धान्याचा साठा करताना शिधावाटप प्रशासनाला माहिती देणे आवश्यक असते. मात्र, अशी कोणतीही माहिती या व्यापाऱ्यांनी दिली नव्हती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे धान्य वाशीतील घाऊक बाजारात उतरते आणि पुढे ते मुंबई, ठाण्यातील किरकोळ बाजारात तसेच काही बडय़ा मॉलमध्ये विक्रीसाठी जाते. अन्नधान्य बाजारातील वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तूंची थेट पणनची परवानगी असली तरी अजूनही एपीएमसीच्या घाऊक बाजारावर मुंबईतील सर्वसामान्य ग्राहक अवलंबून असतो. त्यामुळे मुंबईतील धान्याचा पुरवठा बंद करून व्यापाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारल्याने किरकोळ विक्रेत्यांनी डाळी, तांदूळ, गव्हाचे दर वाढविण्यास सुरुवात केली.  एपीएमसीमध्ये दररोज सुमारे ४५० गाडय़ा धान्य येते. ‘थेट पणन’च्या माध्यमातून मुंबईत धान्याचा पुरवठा होतो आहे हे लक्षात येताच व्यापाऱ्यांनी दोन दिवसांपासून निर्यातबंदी मागे घेतली. मात्र त्याच वेळी नवीन धान्य खरेदी थांबविण्याचा इशाराही दिला. अन्य राज्यांतून येणारे धान्य खरेदी करणार नाही आणि बाजारात सध्या असलेला मालच पुरवायचा, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.