शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय (मेयो), डागा रुग्णालयासह विविध शासकीय रुग्णालय परिसरात गेल्या पाच-सहा महिन्यात चोरी आणि लोकांना लुबाडण्याच्या घटना मोठय़ा प्रमाणात होत असल्यामुळे या रुग्णालयांमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गरिबांचे रुग्णालय म्हणून ख्याती असलेल्या मेडिकल, मेयो या रुग्णांलयामध्ये सुरक्षा व्यवस्था केवळ नावाला असल्यामुळे गेल्या काही दिवसात रुग्णालयांमध्ये चोरीचे आणि नागरिकांना लुबाडल्याचे प्रकार घडले आहेत. मेडिकलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दोन प्रतीक्षालय असले तरी त्यात असलेली अस्वच्छता आणि मद्यपींचा वावर त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक तेथे आराम न करता वॉर्डाच्या बाहेर असलेल्या कॅरिडोरमध्ये सतरंजी टाकून आराम करतात. रात्रभरात त्यांचे सामान चोरीला गेल्याच्या घटना घडल्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कुठलाही सुरक्षा रक्षक नाही. याशिवाय कुठल्याही वॉर्डामध्ये प्रवेश केला तरी त्या प्रवेशद्वाराजवळ विचारणा करण्यासाठी कोणी सुरक्षा रक्षक किंवा रुग्णालयातील कर्मचारी दिसून येत नाही. त्यामुळे अनेक लोक वॉर्डात बिनधास्तपणे फिरताना दिसून येतात. बाहेरगावावरून आलेल्या एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकाला संबंधित वॉर्ड दिसत नसेल तर त्याने कुठे विचारावे यासाठी माहिती कक्ष नाही. बाह्य़ रुग्ण विभागात काही नागरिक विचारणा करीत असतात, मात्र त्यांच्याशी नीट बोलले जात नसल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या आहेत.
शासकीय रुग्णालय परिसरात ठेवण्यात आलेली वाहने चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. गेल्या महिन्यात रुग्णालयातील दोन डॉक्टरांची वाहने चोरीला गेली. दलालांचा सुळसुळाट पुन्हा एकदा वाढला असून त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. अनेक खासगी रुग्णवाहिका बाह्य़ रुग्ण विभाग आणि शवागाराच्या बाहेर उभ्या असतात. एखादा रुग्ण किंवा शवागारातून पार्थिव नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिका मोठय़ा प्रमाणात  शुल्क आकारतात. दोन महिने आधी पोलीस आयुक्तांनी मेडिकल परिसरात पाहणी करून पोलिसांना सुरक्षेच्या संदर्भात निर्देश देण्यात आले होते, मात्र आयुक्तांच्या निर्देशाचे पालन होताना दिसत नाही. गेल्या महिन्यात मेडिकलच्या कर्मचाऱ्यांनी  लुटमार करणाऱ्या टोळीला पकडून दिले. मेयो रुग्णालयात अशीच परिस्थिती आहे. मेयो रुग्णालयात पोलीस चौकी आहे, मात्र त्याही ठिकाणी चोरांचा सुळसुळाट असून प्रशासनाचा कुठलाही वचक नसल्याचे दिसून येते.
मेडिकल परिसरात दंत महाविद्यालयाच्या मागील भागास असलेल्या वाहनतळामध्ये सुरक्षा व्यवस्था नाही. या भागात कोणीही येऊन वाहने उभी करतात. याशिवाय अधिष्ठाता कार्यालयासमोर वाहनतळ नसताना त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाहने लावली जातात. त्याकडे मेडिकल प्रशासनाचे लक्ष नाही. ज्या कंत्राटदाराकडे वाहनतळाची व्यवस्था देण्यात आली तो अनेक दिवस रुग्णालयात येत नाही. वाहनतळावर वाहने ठेवण्यासाठी कर्मचारी नागरिकांकडून पैसे घेतात.
चोरीच्या प्रकारासोबत रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना आणि रुग्णांना लुबाडण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. जन्माचा दाखला मिळविणे किंवा ईसीजी काढणे ही कामे पैसे दिल्याशिवाय होत नाहीत. या संदर्भात अनेक रुग्णांनी अधिष्ठातांकडे तक्रारी केल्या आहेत, परंतु त्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.