08 March 2021

News Flash

हुडहुडी : पारा पुन्हा घसरला, नागपूर ६.६

काश्मीरची थंडी अनुभवणाऱ्या नागपूरकरांना एक आठवडा थंडीने उसंत दिल्यानंतर सोमवारी रात्रीपासून पुन्हा एकदा गार वाऱ्यांनी नागपूरकरांना हुडहुडी भरवली.

| January 7, 2015 07:50 am

काश्मीरची थंडी अनुभवणाऱ्या नागपूरकरांना एक आठवडा थंडीने उसंत दिल्यानंतर सोमवारी रात्रीपासून पुन्हा एकदा गार वाऱ्यांनी नागपूरकरांना हुडहुडी भरवली. ५ वरून १८ अंश सेल्सिअसवर गेलेला तापमानाचा पारा आज पुन्हा ६.६ अंश सेल्सिअसवर आला. त्यामुळे आठवडाभर शेकोटीला मिळालेल्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा शेकोटय़ा पेटायला सुरुवात झाली.
हवामान खात्याचे अंदाजच जेथे खोटे ठरत आहेत, त्याठिकाणी नागरिकांनाही वातावरणाचा अंदाज येईनासा झाला आहे. कधी उन्हं, कधी पाऊस तर कधी थंडी असा एकूणच पालटलेल्या ऋतुचक्राचा अनुभव त्यांना येत आहे. गेल्या काही वर्षांत यंदा गोठवणारी थंडी पडल्यामुळे कधी नव्हे ते दिवसाही नागरिक स्वेटर, मफलर, टोपी आणि हातमोजात दिवसा बाहेर फिरत आहेत. गारठवणाऱ्या थंडीने एकूणच दिनक्रमात पडलेला बदल साऱ्यांनाच जाणवत आहे. दरम्यान, काही दिवसाची उसंत मिळत नाही तोच पुन्हा कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांच्या दिनक्रमावरसुद्धा परिणाम जाणवत आहे. सकाळीसकाळी शाळेला जाणाऱ्या बच्चेकंपनीच्या चेहऱ्यावरचा त्रासिक भाव, खासगी शिकवणी वर्गाला जाणारे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव कॅमेऱ्यात टिपण्यासारखे आहेत. मात्र, त्याचवेळी ज्येष्ठांच्या पहाटेच्या फिरण्याच्या दिनक्रमात काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे दोन पिढ्यातील हे अंतर सहजपणे जाणवते.
दरम्यान, पावसाने तीन दिवसाची उसंत दिली असली तरीही तेवढय़ाच वेगाने थंडीसुद्धा परतली आहे. थंडीपेक्षाही बोचऱ्या थंडय़ा वाऱ्यांनी एकूणच वातावरण गार झाले आहे. हिमालयाकडून येणाऱ्या थंड व कोरडय़ा वाऱ्यामुळे गेल्या आठवडय़ात संपूर्ण महाराष्ट्र गारठला होता. नागपूरने तब्बल पाच दशकानंतर ५ अंश सेल्सिअस इतके कमी तापमान अनुभवले. २९ डिसेंबर १९६८ला तापमानाने ५.५ अंश सेल्सिअस एवढी नोंद केली होती. दरम्यान, नववर्षांच्या पहिल्याच दिवशी पावसाच्या सरी बरसल्या आणि तापमानात किंचित वाढ झाली. सलग तीन दिवस बरसणाऱ्या पावसाने तापमानाचा पारा बराच उंचावला. त्यामुळे नागपूरकरांना थंडीपासून थोडी उसंत मिळाली. मात्र, सोमवारपासून पुन्हा एकदा हवामानाचे चक्र पालटले आणि थंडीला पुन्हा एकदा सुरुवात झाली. दिवसा उन्हं अनुभवणाऱ्या नागपूरकरांना सायंकाळपासून थंडीने हुडहुडी भरवली. थंडीपासून उसंत मिळाल्यानंतर अनेकांनी त्यांची अडकलेली कामे मार्गी लावली, पण पुन्हा सोमवारपासून सुरुवात झालेल्या थंडीने विझलेल्या शेकोटय़ांना कामी लावले. पावसामुळे थंडीत आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2015 7:50 am

Web Title: low temperature in nagpur
टॅग : Maharashtra,Nagpur
Next Stories
1 जिल्ह्य़ातील १३४ अनुदानित शाळांची मान्यता धोक्यात
2 गतिमंदांनी तयार केली आकर्षक भेटकार्डे
3 आप व मनसेचे कार्यकर्ते थंडावले
Just Now!
X