सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पाचे दरवाजे उघडे राहिल्यामुळे पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय झाला. या प्रकरणी काहीशी उशिरा जाग आलेल्या गोदावरी मराठवाडा पाठबंधारे विकास महामंडळाने जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. सिंचन कायदा १९७६ अन्वये कारवाई का करण्यात येऊ नये, असे या नोटिशीद्वारे कळविण्यात आले आहे.
लोअर दुधनाच्या पाणलोट क्षेत्रात परतूर, मंठा या दोन्ही तालुक्यांमध्ये मोठा पाऊस झाल्यानंतर हे सर्व पाणी लोअर दुधना प्रकल्पात जमा झाले. पण या प्रकल्पाचे दरवाजे उघडे असल्यामुळे हे पाणी वाहून गेले त्यामुळे  दुधना नदीच्या पात्रात आलेल्या या पाण्यामुळे पुराची परिस्थिती उद्भवली. बुधवारी (दि. ३) जोरदार झालेल्या पावसाचा उपयोग जलसाठा वाढण्यासाठी झाला असता पण संबिंधत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रकल्पात पुरेसे पाणी साठले गेले नाही. एवढय़ा मोठय़ा प्रकल्पाचा कारभार एवढा गलथान कसा असू शकतो, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर राजकीय कार्यकर्त्यांनी व माध्यमांनी हा विषय लावून धरला. त्यानंतर गोदावरी मराठवाडा विकास पाटबंधारे महामंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी प्रकल्पास भेट दिली.
या प्रकरणी अधिकारी कोणतीच कारवाई करत नाहीत, असा आरोप करत विविध राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी दबाव टाकल्यानंतर आता प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रकल्पाचे दरवाजे उघडे राहण्याबाबत जबाबदार असणाऱ्या कनिष्ठ अभियंता व अन्य कर्मचाऱ्यांविरुद्ध नोटीस बजावली आहे. दरम्यान नोटीस बजावण्याची कारवाई अपुरी असून अधिकाऱ्यांना कठोर कारवाईची मागणी राजन क्षीरसागर यांनी केली आहे.