गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेली शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, या कार्यकारिणीत निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना संधी देण्याचा घाट घालण्यात आल्याचे दिसते. उपऱ्यांना संधी मिळाल्यास नांदेड उत्तरमधील सेनेचा मोठा गट बंडाच्या पवित्र्यात आहे.
महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेत एक प्रकारे मरगळ आली होती. ती दूर करण्याच्या उद्देशाने पक्षश्रेष्ठींनी हेमंत पाटील व प्रकाश कौडगे यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. सुमारे वर्षभरापूर्वी या दोघांच्या नियुक्त्या झाल्या. पण उर्वरित कार्यकारिणी जाहीर होऊ शकली नाही. जिल्हाप्रमुख नियुक्तीनंतर महिनाभरात उर्वरित कार्यकारिणी घोषित होईल, असे नेत्यांनी सांगितले खरे; पण अजून त्याची अंमलबजावणी झाली नाही.
नांदेड उत्तर मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य बऱ्यापकी आहे. बालाजी कल्याणकर, उमेश मुंडे, मििलद देशमुख, विनय गुर्रम, आनंदा जाधव, बाळासाहेब देशमुख, दत्ता कोकाटे हे सेनेचे नगरसेवक उत्तरमधून निवडून आले आहेत. तरोडा काँग्रेसचा बालेकिल्ला, तसेच प्रस्थापितांशी दोन हात करीत पक्षसंघटन वाढविणारे अनेकजण असताना आता सेनेला विरोध करणाऱ्यांनाच पदांची खिरातपत वाटण्याची तयारी सुरू आहे. उत्तरची जबाबदारी कौडगे यांच्यावर आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता पदाधिकाऱ्यांना निवडण्याचा घाट त्यांनी घातल्याची चर्चा होत आहे.
पदाधिकारी निवडताना निष्ठावंतांना डावलले जात असल्याची भावना शिवसनिकांमध्ये आहे. ज्यांच्याशी आजपर्यंत दोन हात केले, ज्यांचा विरोध पत्करून पक्षसंघटन वाढवले, अशांना पदाधिकारी केल्यास सहन करणार नाही, असे स्पष्ट करीत जुन्या निष्ठावंतांनी बंडाचा इशारा दिला. उपऱ्यांची निवड झाल्यास आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत शिवसेनेच्या एका लोकप्रतिनिधीने अन्य पक्षात जाण्याचीही तयारी दर्शविली. येत्या एक दोन दिवसांत शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्हाप्रमुख कौडगे बाहेरगावी असल्याने त्यांचे म्हणणे समजू शकले नाही.