News Flash

कै. मधुसूदन कानेटकर- संगीतक्षेत्रातले एक ‘गुणीग्यानी’ व्यक्तिमत्त्व

संगीतक्षेत्रातली एक मान्यवर व्यक्ती म्हणून कै. मधुसूदन शंकर कानेटकर (म्हणजे त्यांच्या निकटवर्तीयांचे आप्पा) यांचे छायाचित्र पुण्याच्या भारत गायन समाजातील सभागृहात लावण्यात येणार आहे. त्या दिवशी

| February 3, 2013 01:46 am

संगीतक्षेत्रातली एक मान्यवर व्यक्ती म्हणून कै. मधुसूदन शंकर कानेटकर (म्हणजे त्यांच्या निकटवर्तीयांचे आप्पा) यांचे छायाचित्र पुण्याच्या भारत गायन समाजातील सभागृहात लावण्यात येणार आहे. त्या दिवशी कानेटकरांचा सहावा स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्या संगीतक्षेत्रातील योगदानाचा हा थोडक्यात परिचय! आप्पा म्हणजे कवी गिरीशांचे थोरले चिरंजीव आणि नाटककार कै. वसंतराव कानेटकरांचे थोरले बंधू. त्यांचा जन्म रहिमतपूरला २६ जुलै १९१६ रोजी झाला. लहानपणी १९२७/२८ साली वडिलांनी बक्षीस म्हणून आप्पांना बालगंधर्वाचं ‘एकच प्याला’ हे नाटक दाखवलं. त्या नाटकातली ‘सत्य वदे वचनाला नाथा’, ‘बघू नको मजकडे, राजस बाळा’ इ.
नारायणरावांनी गायलेली करुणरम्य पदे ऐकून आप्पा बेचैन झाले. त्यानंतर १९३२ साली फलटणला मास्तर कृष्णराव, मंजीखाँ आणि बाई सुंदराबाई यांची अविस्मरणीय गाणी, १९३७ साली ‘पुण्यात ऐकलेली अल्लादियाखाँसाहेबांची मेहफिल आणि १९३८ साली कलकत्त्याला रवींद्रनाथांच्या घरी रंगलेलं केसरबाईंचं गाणं अशी रंगतदार गाणी ऐकल्यावर
आता जयपूर-अत्रौली घराण्याची गायकीच शिकायला हवी असा आप्पांनी निश्चय केला आणि १९४० साली कोल्हापूरचे संगीतप्रेमी वकील बाबुराव जोशी यांच्या मध्यस्थीने
आप्पांना भूर्जीखाँसाहेबांची तालीम सुरू झाली. आप्पांचं भाग्य एवढं थोर की, या तालमीसाठी लागणारी आर्थिक मदत करायला वडील आनंदाने तयार झाले आणि गंडाबंधनासाठी लागणाऱ्या पाच हजार रुपयांच्या गुरुदक्षिणेची सोय खुद्द खाँसाहेबांनीच केली. तालीम उत्तम रीतीने चालू असताना आप्पांचा विवाह झाला आणि अपत्यप्राप्ती झाल्यानंतर वाढलेल्या आर्थिक जबाबदारीमुळे अर्थार्जन करण्यासाठी १९४३ साली त्यांनी ‘बहिर्जी नाईक’ या बोलपटात पाश्र्वगायन केले आणि गोविंदराव टेंब्यांच्या नाटककंपनीत त्यांच्याच आमंत्रणावरून नाटकांच्या तालमींनाही सुरुवात केली. परंतु, नाटक-सिनेमाच्या व्यवसायात कराव्या लागणाऱ्या तडजोडी न जमल्यामुळे त्यांनी या क्षेत्राला रामराम ठोकला आणि असाही निर्णय घेतला की संगीतकलेचा उपयोग उपजीविकेसाठी करायचा नाही. याच सुमाराला कवी मर्ढेकरांच्या आग्रहावरून आप्पा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर स्टाफ आर्टिस्ट म्हणून १९४४ साली रुजू झाले आणि मुंबई, नागपूर, कलकत्ता, भूज, पुणे इ. केंद्रांवर निरनिराळ्या पदांवर काम करून अखेर १९७५ साली पुणे केंद्रावरून केंद्र संचालक म्हणून निवृत्त झाले. त्यावेळी मुंबई केंद्रावर बालगंधर्व, कृष्णामास्तर, बेगम अख्तर, बाई सुंदराबाई, मल्लिकार्जुन मन्सूर यासारख्या कलाकारांची आणि मर्ढेकर,
सोपानदेव चौधरी, मंगेश पाडगावकर, पु. ल. देशपांडे यासारख्या साहित्यिकांची मांदियाळी होती आणि संगीताचे उत्तमोत्तम कार्यक्रम सादर करत असल्यामुळे स्वरलयींचा गुंजारव आप्पांच्या कानामनात अविरतपणे चालू होता. कलावंतांची कदर करणारे आणि सहकाऱ्यांच्या हिताची जपणूक करणारे आप्पा हे एक आदर्श अधिकारी होते, असे प्रसिद्ध तबलिये चंद्रकांत कामत  सांगत असत.१९७५ साली निवृत्त झाल्यानंतर आप्पा सांगलीच्या ‘कांचन’ बंगल्यात स्थायिक झाले आणि या मुक्कामात ८१० वर्षे त्यांना ऋषितुल्य संगीतगुरू प्रा. बी. आर. देवधर यांचे मार्गदर्शन झाल्यामुळे आप्पांच्या संगीतविषयक ज्ञानात भर पडून त्यांच्या कलादृष्टीला एक व्यापक वैचारिक बैठक प्राप्त झाली. आतापर्यंत गुंडोपंत वालावलकर, गजाननराव जोशी, सुरेशबाबू माने, मास्तर कृष्णराव, गुलुभाई जसदनवाला, भूर्जीखाँ, त्यांचे चिरंजीव अजिनुद्दिनखाँ (बाबा) आणि देवधरबुवा यांच्याकडून भ्रमरवृत्तीने कंठगत केलेल्या गायकीचा समृद्ध खजिना आता शिष्यांच्या हवाली करायला हवा याची जाणीव आप्पांना होऊ लागली आणि जणू काही त्यांच्या
हाकेला ओ दिल्यासारखे, तबलावादक आनंद असनारे आपली मुलगी मंजिरी हिला घेऊन आप्पांच्या घरी आले ते १९८८ साल. पु. लं. च्या म्हणण्याप्रमाणे गुरुपुष्यापेक्षाही दुर्लभ
असा गुरुशिष्याचा योग जमून आला होता आणि दररोज सहा-सहा तास तालीम चालू होती. मंजिरी चांगली तयार होत होती आणि संगीत हेच साधन आणि साध्य मानणाऱ्या
आप्पांच्या जीवनाला एक नवा अर्थ प्राप्त झाला. मंजिरीचं एनसीपीएमध्ये झालेलं गाणं ऐकून पु.लं.नी ‘ही तर केसरबाईच गाते आहे!’ या उद्गाराने दिलेली दाद ऐकून आप्पा कृतार्थ झाले. याआधी सांगलीला रेखा देशपांडे या आप्पांकडे काही दिवस गाणं शिकत होत्या. १९९५ साली सांगली सोडून पुण्याला स्थायिक झाल्यानंतर वर्षां जोशी (सोहनी), मधुवंती देव, अरुंधती भेडसगावकर, अंजोर दीक्षित, कुमुदिनी काटदरे, मंजिरी आलेगावकर, अलका देव-मारुलकर, राजेंद्र मणेरीकर, वासंती टेंबे या नव्या शिष्याच्या तालमी पुण्यात आणि पुण्याबाहेर सुरू झाल्या आणि आप्पांच्या उत्साहाला वयाची ८० उलटल्यानंतर नवी पालवी फुटली. त्यांची विद्यादानाची तळमळ आणि यासाठी ते करत असलेले कष्ट त्यांच्या तरुण शिष्यवर्गाला लाजवणारे होते. कधी शिष्यांच्या घरी अगर त्यांच्या गावी जाऊन शिकवण, तर कधी कोल्हापूरला जाऊन अजिजुद्दिनखाँसाहेबांकडे काही
अनवट बंदिशी शिकणे आणि त्या शिष्यांना शिकवणे या गोष्टी अखंडपणे चालू होत्या. ही संगीतसाधना आणि संगीत अध्यापन हे ‘स्वान्त: सुखाय’
असल्यामुळे या निरपेक्ष विद्यादानाचं मानधन त्यांनी कधीही घेतलं नाही. कारण संगीताचा वापर चरितार्थासाठी करायचा नाही हे त्यांचं ब्रीद होतं. गुरू िशष्याच्या नात्याच्या पावित्र्याची जपणूक व्हावी आणि ते जाहीर समारंभाचा विषय होऊ नये, म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करायला त्यांनी सतत विरोधच केला. अगदी अखेरच्या दिवसात कॅन्सरशी झुंज देत असताना शिष्यवर्गाच्या आंत्यतिक आग्रहाखातर त्यांनी एकदाच या कार्यक्रमासाठी संमती दिली ती २००६ साली आणि ती पहिली आणि अखेरची गुरुपौर्णिमा.
जयपूर घराण्याचे अभिमानी असले तरी इतर घराण्याबद्दल आप्पांचा उदार दृष्टिकोन होता. कुठल्याही कलाकाराच्या गाण्यातही चांगली वैशिष्टय़ ते उलगडून सांगायचे. संगीताबद्दल चर्चा करायला ते सदैव उत्सुक असत. प्रो. क्लेटन या ब्रिटिश संगीत अभ्यासकाबरोबर संगीत विषयावर त्यांनी इंग्रजीत केलेली चर्चा ऐकण्यासारखी आहे. तालयोगी
सुरेशजी तळवलकर, पं. उल्हास कशाळकर यांसारख्या तरुण कलाकारांबरोबर विचारांची देवाण- घेवाण करायला ते उत्सुक असत. अशाच एका चर्चेच्या वेळी त्यांनी
संगीताच्या सखोल चिंतनानंतर एक अर्थगर्भ विधान केले ते असे की, ‘बंदिश हे गाण्याचं सगुण रूप आहे आणि गायकी हे निर्गुण रूप आहे.’ अशा या ज्ञानी सुरेल कलाकाराचा
अंत आपली आवडती शिष्या मंजिरी असनारे-केळकर हिने निर्माण केलेल्या स्वरमयी वातावरणात व्हावा हेच उचित होतं. ३ फेब्रुवारी २००७ रोजी तिने गायलेल्या केदारच्या  बंदिशीचे स्वर वेत विरत असताना आप्पांची प्राणज्योत हळूहळू मालवत गेली. `Many a flower is born to blush unseen’ या काव्यपंक्तीप्रमाणे कुणाला नकळत उमलणाऱ्या सुगंधी फुलाप्रमाणे प्रसिद्धीपराङ्मुख असलेल्या आप्पांचं जीवन होतं. अशा या ‘सूरसंगत रागविद्या’ निपुण मान्यवराला शतश:प्रणाम!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2013 1:46 am

Web Title: lt madhusudan kanetkar one talented and knowledgeable personality in music sector
Next Stories
1 औंध विकास मंडळाच्या वतीने रिव्हर्सिग हॉर्न विरुद्ध अभियान
2 भिलारेवाडीच्या उपसरपंचाचा खून राजकीय वादातून झाल्याचा संशय
3 एनसीसी केंद्रात प्रशिक्षणात गोळी लागून विद्यार्थी जखमी
Just Now!
X