शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खासदार राजू शेट्टी व भाजपचे माजी आमदार पाशा पटेल यांनी अलीकडे वेगवेगळी आंदोलने केली. परंतु पटेलांच्या मदतीने लातूर जिल्हय़ात आपली खुंटी बळकट केल्यानंतर शेट्टी यांनी आता पटेलांच्या नेतृत्वासमोर आव्हान उभे केल्याचे चित्र तयार झाले आहे.
शेट्टी हे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नेते. लातुरात पाशा पटेल यांच्या पुढाकाराने शेट्टींना ४ वर्षांपूर्वी मोकळे मैदान देण्यात आले. पटेल यांनी आपले काही शिलेदार शेट्टींच्या दिमतीला दिले. मात्र, आता चार वर्षांनी शेट्टी यांनी जिल्हय़ात आपली खुंटी चांगलीच बळकट केल्यामुळे पटेलांच्या नेतृत्वासमोर आव्हान उभे राहू पाहात आहे. पटेल शेतकरी संघटनेत सक्रिय होते. भाजपत प्रवेश केल्यानंतर केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा देणे राजकारणात शक्य होत नसल्यामुळे व पश्चिम महाराष्ट्रातील ऊस आंदोलन यशस्वी हाताळणाऱ्या शेट्टींना लोकांपुढे आणले पाहिजे, या हेतूने पटेलांनी शेट्टींना लातुरात प्रवेश सुकर केला. शेट्टींची अडचण होऊ नये म्हणून सुरुवातीच्या काळात शेतकरी संघटनेतील संघटनकौशल्य असलेले कार्यकत्रे त्यांच्या दिमतीला दिले. अधूनमधून शेट्टी लातुरात येत होते. ऊसप्रश्नावरील आंदोलनात आपले म्हणणे मांडत होते. लातूरकरांना ते पटत होते. शेट्टींच्या आक्रमक भूमिकेचा प्रभावही लातूरकरांवरही चांगलाच पडत होता.
पटेल यांनी गतवर्षी शेतीमालाच्या हमीभावासाठी लातूर ते नागपूर पायी िदडी काढली. त्यामुळे विधानसभा व विधान परिषदेत पटेलांचा चांगलाच बोलबाला झाला. भाजपने त्यांना विधान परिषदेत दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व दिले नसले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी देशातील नेतृत्व म्हणून पटेलांची निवड केली. आताही अलीकडेच सोयाबीनच्या प्रश्नावर रान उठवण्यासाठी पटेलांनी १९ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरदरम्यान औसा तालुक्यातील लोदगा ते औरंगाबाद विभागीय आयुक्तालय अशी शेतकरी िदडी काढली. िदडीला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला. नेमक्या याच कालावधीत शेट्टी यांनी सोयाबीनला प्रतिक्विंटल ५ हजार रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी लातूर शहरात सोयाबीन परिषद घेतली. दयानंद सभागृहात झालेल्या या परिषदेस जिल्हय़ातील शेतकरी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे नेते सदा खोत यांच्या भाषणानंतर श्रोत्यांनी त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतले. तीन दिवसांपूर्वी जिल्हय़ातील अहमदपूर येथे ऊस व सोयाबीनच्या प्रश्नावर शेट्टी यांनी घेतलेल्या परिषदेसही चांगला प्रतिसाद मिळाला. शेट्टी केवळ ऊसउत्पादक आंदोलनाचे नेते आहेत, अशी त्यांची झालेली प्रतिमा सोयाबीनच्या प्रश्नासंबंधी भूमिकेमुळे बदलण्यास मदत झाली.
लातूर जिल्हय़ातील कोरडवाहू शेतकरीही शेट्टींच्या मागे उभे राहात असल्यामुळे त्यांची जिल्हय़ातील ‘खुंटी’ चांगलीच बळकट होत आहे. ‘पटेलांनी शेट्टींना आधारासाठी बोट दिले, तर शेट्टींनी पटेलांचा हातच ओढून घेतला’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी जिल्हय़ात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणारे पटेल हे एकमेव नेते होते. आता शेट्टी यांच्यामुळे पटेलांच्या एकमुखी नेतृत्वाला आव्हान मिळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.