महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत रस्त्याचे काम मजुरांऐवजी मशिनने केले जात असल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी अचानक तपासणीचे आदेश बजावले. तहसीलदारांच्या भेटीत मशिनने काम होत असल्याचे आढळून आले.
तहसीलदारांनी ही मशिन जप्त केली. ग्रामरोजगार सेवक व मशीनचालकावर तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
गेवराई तालुक्यातील नंदपूर ते खर्डा रस्त्याचे दोन किलोमीटरचे काम महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर करण्यात आले. या योजनेतील काम मजुरांकडूनच करावे, असे आदेश आहेत. पण रस्त्याचे काम संबंधितांनी संगनमत करून मशिनने सुरू केले. गेल्या १५ दिवसांपासून हे काम मशिनने केले जात होते. या बाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ तहसीलदारांना या बाबत तपासणीचे आदेश दिले. गुरुवारी रात्री तहसीलदार चंद्रकांत शेळके व गटविकास अधिकारी बी. के. सूर्यवंशी यांनी पाहणी केली असता मशिनने काम होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर हे मशिन जप्त करण्यात आले व चालक मदन बाबुराव डांगे (बुलढाणा) व ग्रामरोजगार सेवक शेख हबीब यांच्याविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.