‘अल्टीमेट मेलडीज ऑफ मदनमोहन’चा पहिला प्रयोग
‘तेरी आँखो के सिवा.. दुनियामें रखा क्या है’, ‘रंग और नूर की बारात किसें पेश करूँ’ अशी एकापाठोपाठ एक संगीतातील अवलिया मदनमोहन यांनी संगीत दिलेली गाणी सादर होऊ लागली आणि प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाचे सभागृह टाळ्यांनी दणाणून गेले. ‘स्वरगंधार’ आणि ‘लोकसत्ता’ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ‘अल्टीमेट मेलडीज ऑफ मदन मोहन’ या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग सादर झाला. संगीतकार मदन मोहन यांच्या मधुर गीतांचा नजराणा असणाऱ्या कार्यक्रमाचे आणखी तीन प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत.
या कार्यक्रमाची सुरुवात संगीत संयोजक अविनाश चंद्रचूड यांनी एकूण पंचवीस वादकांच्या साथीने पियानोवर वाजवलेल्या ‘है तेरे साथ मेरी वफा’ या गाण्याने करण्यात आली. त्यानंतर भूली हुई यादें, जरासी आहट होती है, लग जा गले, आपकी नजरों ने समझा अशी गाणी सादर झाली. या गाण्यांना रसिकांनी मनापासून दाद दिली. गायक ऋशिकेष रानडे, सोनाली कर्णिक आणि विद्या करलगीकर यांनी ही गाणी सादर केली. सोनाली कर्णिक यांनी सादर केलेले ‘वो भूली दास्ताँ’ आणि ऋषिके शने गायलेल्या ‘तुम जो मिल गए हो’ या गाण्यांना रसिकांची विशेष दाद मिळाली. या सूरमयी कार्यक्रमाचे निवेदन अंबरीश मिश्र यांनी केले होते. व्हायोलिन्स, सॅक्सोफोन, मेंडोलिन, सितार, पियानो, गिटार अशा एकूण पंचवीस वादकांच्या साथीने ही संगीताची मैफल रंगली. या कार्यक्रमातील दोन प्रयोग सादर झाले असून उर्वरित दोन प्रयोग अनुक्रमे शनिवारी, २८ जून रोजी ठाण्यात काशिनाथ घाणेकर नाटय़गृह येथे आणि रविवारी २९ जून रोजी प्रभादेवीत रवींद्र नाटय़मंदिर येथे रात्री ८.३० वाजता होणार आहे. या दोन्ही प्रयोगांच्या देणगी प्रवेशिका नाटय़गृहावर उपलब्ध आहेत. अधिक चौकशीसाठी मंदार कर्णिक यांच्याशी ९८२०७५७४३५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.