प्रत्येक राज्यामध्ये महिलावर अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. यासाठी मागील काही अनेक वर्षांपासून जनजागृतीदेखील करण्यात येत आहे. मध्य प्रदेशात सुरू झालेल्या बेटी बचाव अभियानात महाराष्ट्राला मागे टाकले आहे. मध्य प्रदेश सरकारने विविध अभियानांबरोबरच शेतीतही विकास साधला असल्याचे प्रतिपादन मध्य प्रदेशच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री माया सिंग यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या बेलापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शन मेळावा वाशी येथील ज्ञाती सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी सिंग बोलत होत्या. मध्य प्रदेश सरकारने केलेल्या विविध योजनांमुळे शेतीचा विकास दर १८ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. यामुळे येथील शेतकरी महाराष्ट्रापेक्षा अधिक प्रगत असल्याचा दावा त्यांनी केला.  स्त्रीभ्रूण हत्येचे विषय असो वा शैक्षणिक क्रांती, त्याचबरोबर शासनस्तरावरच्या विविध योजना मध्य प्रदेश सरकारने प्रभावीपणे राबविल्या आहेत.
 मध्य प्रदेशचा समतोल विकास साधल्याचे सिंग म्हणाल्या. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही दोन्ही राज्ये समांतर असून केवळ मध्य प्रदेश सरकारच्या नियोजित भूमिकेमुळे आज महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेश पुढे गेल्याचे सूतोवाच त्यांने केले.
आगामी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मार्गदर्शन करताना केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणामुळे महाराष्ट्रात सत्ता आल्यास निश्चितपणे महाराष्ट्राचादेखील कायापालट करून दाखवू, असे त्यांनी सांगितले.