19 September 2020

News Flash

..आता मध्य प्रदेश पर्यटन विभागाचीही नाशिकवर स्वारी

नेत्रदीपक राजवाडय़ांनी सजलेले ग्वाल्हेर.. दुर्मीळ सफेद वाघांचा अधिवास असणारे बांधवगड अभयारण्य.. सातपुडा व विंध्य पर्वतराजींमधून वाहणाऱ्या नर्मदा नदीवरील असंख्य धबधबे.. एवढेच नव्हे तर, ओंकारेश्वर व

| December 12, 2012 12:28 pm

नेत्रदीपक राजवाडय़ांनी सजलेले ग्वाल्हेर.. दुर्मीळ सफेद वाघांचा अधिवास असणारे बांधवगड अभयारण्य.. सातपुडा व विंध्य पर्वतराजींमधून वाहणाऱ्या नर्मदा नदीवरील असंख्य धबधबे.. एवढेच नव्हे तर, ओंकारेश्वर व सुबक कलाकृतीचे इंद्रेश्वर मंदिर, सिंहस्थ कुंभमेळा भरणारे उज्जन आदी धार्मिक स्थळांबरोबर जगप्रसिद्ध खजुराहोच्या लेण्या..
मध्य प्रदेशातील या वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांचा पट उलगडला, तो मंगळवारी मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाने. गुजरातपाठोपाठ मध्य प्रदेशने देखील नाशिक परिसरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खास मोहीम हाती घेतली आहे. फेब्रुवारीमध्ये आयोजित ‘खजुराहो क्लासिकल डान्स’ महोत्सवात पर्यटकांनी सहभागी व्हावे, असा त्यांचा प्रयत्न आहे. मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत पर्यटकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असली तरी ती अधिक वृद्धिंगत करण्याकडे महामंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. त्याकरिता मुंबई व नागपूर नंतर अलीकडेच पुणे येथेही मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे कार्यालय सुरू करण्यात आले. २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत खजुराहो महोत्सव होणार असल्याची माहिती पर्यटन अधिकारी लीना करकेरा यांनी दिली. मध्य प्रदेशवर राज्य करणाऱ्या होळकर, राजपूत, सुलतान यांसारख्या राजघराण्यांचा इतिहास आजही येथे वास्तुरूपात पाहावयास मिळतो. ग्वाल्हेर हे त्यापैकीच एक शहर. कुशल कारागिरांनी बनविलेल्या विविध राजवाडय़ांमुळे हे शहर सिटी ऑफ पॅलेस म्हणून ओळखले जाते. ग्वाल्हेर, इंदौर, मण्डू तसेच माहेश्वर येथील नर्मदा नदीच्या काठावर पेशवा घाट, अहिल्या घाट आहे. तसेच राजबीरसिंह यांनी आंचा येथे उभारलेला जहांगीर महल उत्कृष्ट कलाकृतीचा नमुना पाहावयास मिळेल. वास्तू रचनेसाठी आवश्यक असणाऱ्या संगमरवरी दगडांचा येथे मोठा साठा आहे. भोपाळच्या दक्षिणेस भीमबेटका येथे डोंगळ माळरानात नैसर्गिक वनौषधी असून परिसरात सहाशेहून अधिक गुहा आहेत. पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व लाभलेले चित्रकूट शहरालाही निसर्गसौंदर्याची विलोभनीय देणगी लाभल्याचे करकेरा यांनी नमूद केले. प्रियदर्शनी पेंच राष्ट्रीय उद्यान, पंचमहुरी, बांधवगड या ठिकाणी वन्यप्राण्यांच्या जीवनाची अगदी जवळून अनुभूती घेता येईल. महामंडळाने पर्यटकांच्या भ्रमंतीसाठी हॉटेलमधील आलिशान कक्षाप्रमाणे व्यवस्था असणारी खास कॅराव्हॅनची व्यवस्था उपलब्ध केली आहे. तसेच विमानाने पर्यटनस्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी कमी आसनाच्या छोटय़ा विमानांची व्यवस्था असल्याचे या वेळी सांगण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून गुजरातने महाराष्ट्रातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी खास मोहीम हाती घेतली आहे. त्यानंतर मध्य प्रदेशनेही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत तसे प्रयत्न सुरू केल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 12:28 pm

Web Title: madhya pradesh tourism department also look towards nashik
टॅग Nashik
Next Stories
1 भंवरलाल जैन यांचे पाणी व्यवस्थापन तंत्र नव्याने अधोरेखीत
2 पंचवटीतील गोपाळनगर भागात उद्या पाणी नाही
3 शिवशाही प्रतिष्ठानतर्फे शरद पवार यांना १२०० पत्रांव्दारे शुभेच्छा आणि सूचनाही
Just Now!
X