नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती
भारतीय जनता कामगार महासंघाच्या माध्यमातून कामगारांच्या न्याय मागण्या मांडण्यासाठी तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येथील संभाजी स्टेडियममध्ये शनिवारी सायंकाळी पाच वाजता उत्तर महाराष्ट्रातील कामगारांचा महामेळावा घेण्यात येणार आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हे मेळाव्याच्या निमित्ताने ‘समान काम समान वेतन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
औद्योगिक क्षेत्रात विविध कंपन्यांमध्ये कायम कामगारांसोबत सुमारे ७० टक्के कामगार कंत्राटी स्वरुपात कार्यरत आहेत. समान काम समान वेतन या तत्वाचा अवलंब होत नसल्याने कंत्राटी कामगारांना अनेक आर्थिक, सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भारतीय जनता कामगार महासंघाच्या माध्यमातून असंघटीत असलेल्या कंत्राटी कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी व्यासपीठ मिळवून देण्याचे काम करण्यात आले असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे. या अंतर्गतच उत्तर महाराष्ट्रातील असंघटीत कंत्राटी कामगारांना महामेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आणण्याचे काम करण्यात येत आहे. गडकरी यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री व कामगार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रल्हाद पटेल, खा. हरिश्चंद्र चव्हाण, खा. प्रतापदादा सोनवणे हेही या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.
बांधकाम तसेच घरगुती कामगार महामंडळाच्या धर्तीवर कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे या प्रमुख मागणीसह किमान वेतन धोरणाचा अवलंब, किमान वेतन वाढ, कामगारांना कायम कामाची हमी, निवृत्ती व भत्ता यांसारख्या योजना यासंदर्भातील मागण्यांबाबत मेळाव्यात चर्चा करण्यात येणार आहे. भाजपच्या वचननामा नियोजन समितीचे प्रमुख गडकरी यांनी यात पुढाकार घेण्याकरिता त्यांना साकडे घातले जाणार आहे. सर्वानी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आवाहन भारतीय जनता कामगार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपाळ पाटील, प्रदेश चिटणीस विक्रम नागरे, युनूस सय्यद, युवराज पाटील आदींनी केले आहे.